सारशी भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सपशेल लूट केली जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या भाताच्या वजनामध्ये मापात पाप करत गोणींची अफरातफर झाली असल्याचा आरोप खुद्द शेतकऱ्यांनी केला आहे. ४३ गोणी भात नेमका गेला कुठे? याची सखोल चौकशी करण्याची मागणीदेखील केली असून या विषयावर शिवसेना आक्रमक झाली आहे. सारशी भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी केली आहे.
वाडा तालुक्यातील सारशी भात खखरेदी केंद्र हे महत्त्वाचे असून परिसरातील शेतकरी आपला भात विकण्यासाठी तेथे जातात. मोज या गावातील शेतकरी अशोक पटारे, उर्मिला पटारे, दिव्या पटारे यांनी आपला भात खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला होता. नियमानुसार एका गोणीचे वजन ४० किलो ५०० ग्रॅम एवढे असणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांकडून ४१ किलो ५०० ग्रॅम इतका भात घेण्यात आला. म्हणजे एका गोणीमागे एक किलो भात जास्त घेतल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अशोक पटारे यांनी एकूण १६३ गोणी भात जमा केला होता, परंतु त्यांना केवळ १२० गोणींचीच पावती देण्यात आली. उर्वरित ४३ गोणी भात केंद्रप्रमुख, अध्यक्ष आणि मिलर महेश बांगर यांच्या संगनमताने गायब करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे हमालीचे पैसेही वसूल केले जातात. या प्रकरणी अशोक पटारे, उर्मिला पटारे व दिव्या पटारे या शेतकऱ्यांनी जव्हार येथील सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
सरकारी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होणे सहन केले जाणार नाही. केंद्रचालक आणि मिलर यांच्यातील ही ‘मिलीभगत’ उघड झाली आहे. याप्रकरणी प्रादेशिक व्यवस्थापक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल.
अॅड. ओमकार पाटील, जिल्हाप्रमुख, पालघर




