आयएसआयचा पंजाब स्फोटांशी संबंध
Marathi May 07, 2026 01:25 PM

गुप्तचरांनी केला पर्दाफाश, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काही दिवसांपूर्वी पंजाब राज्यामध्ये झालेल्या स्फोटांमागे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय या संघटनेचा हात आहे, हे पुराव्यानिशी उघड झाले आहे. भारताच्या गुप्तचरांनी या संदर्भात केंद्र सरकारला सावध केले असून भारतात दहशतवादी हल्ले घडविण्याचा आयएसआयचा प्रयत्न असेल, असा इशारा गुप्तचरांनी दिल्याने संवेदनशील स्थानी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केलेली आहे.

पंजाबमध्ये भारताच्या सीमा सुरक्षा दलावर हल्ले होण्याचे आणि या दलाच्या आस्थापनांच्या परिसरांमध्ये स्फोट घडविण्याचे प्रकार घडत आहे. प्रथम हे कृत्य खलिस्तानवादी लोकांकडून घडत असल्याचा संशय होता. तथापि, आता आयएसआयशी संबंध पुढे येत आहे. त्यामुळे या स्फोटांना आता वेगळे वळण मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. देशातून आम्ही नक्षलवाद आणि माओवाद जवळपास संपुष्टात आणला आहे. आता आम्ही दहशतवादही अशाच प्रकारे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. या ध्येयपूर्तीचे उत्तरदायित्व सीमा सुरक्षा दलाला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे दहशतवादी संघटना बिथरल्या असून आपले नैराश्य झाकण्यासाठी त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कार्यालयांवर बाँब फेक केली, असे प्रतिपादन करण्यात आले.

या हल्ल्यांचा सूत्रधार पाकिस्तानातील एक गुंड असून त्याचे नाव शेहजाद भट्टी असल्याची माहिती देण्यात आली. भट्टी हा आयएसआय या संघटनेसाठी काम करत आहे. तो या संघटनेने नियुक्त पेलेला व्यक्ती आहे. भारताच्या गुप्तचरांनी सादर केलेल्या अहवालात अनेकदा या भट्टीचे नाव प्रामुख्याने आलेले आहे. पंजाबमध्ये भट्टीने आपले काही हस्तक पेरले असून ते स्फोट घडविण्याच्या दशहतवादी कारवाया करीत आहेत, अशी माहिती गुप्तचरांनी भारताला दिली.

नुकसानाशी संबंधित मानसिक ताण

भारतात बाँब स्फोट घडवून देशाच्या साधनसंपत्तीची हानी करणे, तसेच देशातील विशिष्ट धर्माच्या युवकांना भरकटवून त्यांना दहशतवादाच्या मार्गाला लावणे या कामांसाठी आयएसआयने भारतात आपले जाळे विस्तारण्याचा प्रयत्न चालविला आहे. भटी हा याच योजनेतील महत्वाचा दुवा आहे, हे आता उघड होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.