प्रेम प्रकरण तरुणीच्या जीवावर बेतलं, तो गुपचूप घरात आला आणि…,'त्या' काही मिनिटांत काय घडलं, तरुणी थेट रुग्णालयात
Tv9 Marathi May 07, 2026 04:45 PM

Pune Crime : पुण्यात नक्की काय सुरु आहे? असा प्रश्न तुम्हला देखील पडला असेलच… नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिला ठार मारल्याची घटना ताजी असताना, आपल्या 9 वर्षांच्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. या दोन्ही घटनांमुळे वातावरण तापलेलं असताना एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. पठारेवस्ती चंदननगर परिसरा संबंधित घटना घडली आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमप्रकरणातून प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित तरुणी फक्त 22 वर्षांची आहे. हल्ला झाल्यानंतर प्रियकर फरार झाला तर, पीडितेला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आधी तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण अवस्था अधिक गंभीर असल्यामुळे तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे… असं देखील सांगण्यात येत आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी दिलीप राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (वय.25) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच मॉलमध्ये काम करत होते. तेथेच दोघांमध्ये प्रेम झालं. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होते.

‘त्या’ काही मिनिटांत नेमकं काय घडलं?

दोघांमध्ये वाद सुरु असल्याने आरोपी पीडितेच्या घरी आला. वाद टोकाला पोहोचल्यानंतर, आरोपीने तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी तेव्हा घरी एकटीच होती. तिचा भाऊ आणि वहिनी कामावर गेलेले… हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. त्यानंतर पीडितेने भावाला फोन केला आणि सांगितलं, ‘तू लवकर घरी ये मला एका मुलाने मारलं आहे. खूप लागलं आहे… माझ्या गळ्यातून आवाज येत नाही…’, बहीण असं म्हणताच भाऊ तात्काळ घरी आला.

तरुणीने भावाला व्हिडीओ कॉल केल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यावेळी तरुणी भावाला रक्तबंबाळ अवस्थेत दिसली. भावाने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत तेथील काही नागरिक आणि तरुणीचे नातेवाईक जमा झाले होते. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणीला तिला कोणी मारलं असं विचारलं तेव्हा तिला बोलता येत नव्हतं.

अशात, तिने इशारा करुन पेन आणि कागद मागितला आणि दिलीप राठोड याचं नाव लिहिलं. पीडितेच्या जबाबानंतर चंदन नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.