मुंबई: देशातील 5 राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपला (BJP) मोठं यश मिळालं असून 5 पैकी 3 राज्याच भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापनेचं यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये भाजपला 200 हून अधिक जागा जिंकता आल्याने या विजयाची देशभर चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे तामिळनाडूत सुपरस्टार अभिनेता थपलती विजयच्या (Vijay thalpati) टीव्हीके पक्षाने पदार्पणातच 108 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील विजय आणि टीव्हीकेचं अभिनंदन केलं. त्यानंतर, आज 7 मे रोजी अभिनेता विजय थलपती मुख्यमंत्रीपदाची शपथही घेणार होता. मात्र, तेथील राज्यपालांनी काही तांत्रिक अडचणी सांगत सत्तास्थापनेचं निमंत्रणच न दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच, आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी मंत्री कपिल सिब्बल (Kapil sibal) यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप केलाय.
तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीत विजय थलपतीच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकल्या आहेत. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी 10 आमदारांची गरज आहे. त्यामुळे, नेमकं कुणाच्या पाठिंब्यावर तिथं टीव्हीकेचं सरकार स्थापन होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
तमिळगा वेत्री कळघमचे (TVK) प्रमुख विजय यांनी गुरुवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा विजयने केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही त्यांनी राज्यपालांना दिला. मात्र, भाजपने अचानक या सत्तासमीकरणात एंट्री घेतल्याने तमिळनाडूच्या राजकारणात नवे वळण मिळाले आहे. एआयएडीएमकेने थलपती विजय यांच्या टीव्हीकेसोबत युती करावी, यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये काँग्रेसने दमदार पुनरागमन केल्यानंतर तमिळनाडूतही काँग्रेसला सत्तेत स्थान मिळू नये, अशी भाजपची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप एआयएडीएमके आणि टीव्हीके यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, अशी भूमिका घेत आहे. दुसरीकडे तामिळनाडूच्या राज्यपालांनी अद्यापही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राज्यपालांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन, पत्रकार परिषद घेत तामिळनाडूतील सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलंय. तामिळनाडूचे राज्यपाल हे भाजपचे एजंट आहेत, भाजपच्या हितासाठी ते संविधानाची पायमल्ली करत आहेत. विजयला (सर्वात मोठ्या पक्षाचा नेता) सत्तास्थापनेसाठी बोलवा, त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ द्या, असे म्हणत कपिल सिब्बल यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्यावर जोरदार टीका केलीय. विजय यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडू द्या. निवडणुकीनंतरची कोणतीही आघाडी बहुमतात नाही. सरकारीया आयोगाने हे तत्त्व स्पष्टपणे मांडले आहे. हा आता प्रस्थापित कायदा आहे. पण ऐकतो कोण? असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय.
Tamil Nadu
— Kapil Sibal (@KapilSibal) May 7, 2026
Governors are agents of BJP
They maul the constitution to serve BJP’s interests
Call Vijay (leader of single largest
party)
Swear him in as CM
Let him prove his majority on the floor of the House
No post poll alliance in majority
Sarkaria Commission
Settled…
तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या पाठींब्याने सरकार स्थापन करण्याची तयारी TVK ने दाखवूनही राज्यपालांकडून त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं जात नाही. कर्नाटकमध्ये 2018 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बहुमत नसतानाही कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल विजुभाई वाला यांनी सर्वाधिक जागा असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेचं निमंत्रण देऊन येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचीही शपथ दिली होती. पण, तिथं भाजपचा मुख्यमंत्री बसवायचा म्हणून सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आज तमिळनाडूच्या जनतेने भाजपला साफ नाकारून सर्वांत मोठा पक्ष म्हणून TVK ला सर्वाधिक जागा दिल्या असूनही ‘तमिळनाडूचे 'कोश्यारी’ हे TVK चे नेते विजय यांना अजूनही सरकार स्थापनेचं निमंत्रण देत नाहीत. कदाचित त्यांना तमिळनाडूमध्येही महाराष्ट्र, दिल्ली, गोवा राज्यातील पॅटर्न राबवून भाजपाच्या एकमेव आमदाराला मुख्यमंत्रीपदी नेमायचं की काय, अशीच शंका येते, असेही रोहित पवार यांनी म्हटलंय.