शेती नियोजनासाठी हवामान केंद्राचा आधार
esakal May 09, 2026 08:45 PM

परिंचे, ता. ९ : युनायटेड वे, मुंबई या संस्थेने उन्नती प्रकल्पांतर्गत परिंचे (ता.पुरंदर) ग्रामपंचायत कार्यालयात अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र तृणाल नाईक व योगेश तांडेल (अभियंता) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.८) कार्यान्वित करण्यात आले.
हवामान केंद्रामुळे परिंचे परिसरातील शेतकऱ्यांना अचूक व ताज्या हवामानाची माहिती उपलब्ध होणार आहे. शेती नियोजनासाठी मोठी मदत होणार असल्याचे सरपंच पुष्पलता नाईकनवरे यांनी सांगितले.

केंद्रामुळे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता यासारखी अचूक माहिती मिळून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, सिंचन आणि रोगनियंत्रण यासाठी योग्य निर्णय घेणे सुलभ होणार आहे. यावेळी युनायटेड वे मुंबईचे प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज बरबेले, ग्रामसेवक शशांक सावंत, डॉ. स्वप्नील मोरे, ईश्वरी ढमढेरे, ललित कदम, कैलास ताकवले, पूजा चिव्हे आणि प्रतीक जगताप उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकरी वर्ग आणि ग्रामसेवकांनीही या हवामान केंद्राचा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पाच किलोमीटर अंतरावरील गावांना फायदा
परिंचे परिसरातील शेतकऱ्यांना स्थानिक हवामानानुसार होणारे बदल आणि पडणारा पाऊस याची अचूक माहिती मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. परिंचे परिसरात पाच किलोमीटर अंतरावरील गावांना या हवामान केंद्रांचा फायदा मिळणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान होते. ते या हवामान केंद्राने टाळण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे उपसरपंच प्रवीण जाधव यांनी सांगितले.

03033

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.