अतिक्रमणांच्या विळख्यात विद्यानगरी
पदपथासह रस्ता व्यावसायिकांच्या ताब्यात; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
जयंत पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोपर्डे हवेली, ता. ९ : कऱ्हाडची विशेष ओळख असलेली विद्यानगरी सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाढत्या गर्दीमुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने का पाहात नाही? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यानगरमध्ये प्ले हाऊसपासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी असल्याने अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. परिणामी, दिवसेंदिवस लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कऱ्हाड- कोरेगाव हा प्रमुख मार्गही याच भागातून जात असल्याने दिवसभर मोठी वाहतूक सुरू असते.
वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाटा या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. पादचाऱ्यांसाठी दोन्ही बाजूंना फुटपाथची सुविधा देखील उभारण्यात आली होती. मात्र, कालांतराने या फुटपाथवर अतिक्रमण झाले. परिसरातील काही व्यावसायिक, हातगाडे चालक आणि छोटे विक्रेते यांनी फुटपाथसह रस्त्याचाही काही भाग व्यापला आहे.
विशेषतः फास्ट फूड व्यावसायिकांनी थेट रस्त्यावर हातगाडे उभे करून व्यवसाय सुरू केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा विद्यानगरीतील वाहतूक समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
--------------------------
वारंवार वाहतूक कोंडी
शाळा आणि महाविद्यालये भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यात चारचाकी, दुचाकी आणि सायकलींची वाढलेली संख्या यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पायी चालणाऱ्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
--------------------------
02621
विद्यानगर : हातगाडे, व्यावसायिकांच्या फलकांनी व्यापलेला पदपथ व रस्ता. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------