संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये अखेर भाजपने सरकार स्थापन केले आहे. आज मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम तुडू आणि निशीथ प्रामाणिक यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. यातील अग्निमित्रा पॉल यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. सुरुवातीला त्यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते मात्र आता त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अग्निमित्रा या राजकारणात येण्यापूर्वी त्या एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर होत्या. त्यांनी श्रीदेवी आणि मथून चक्रवर्ती अशा दिग्गज कलाकारांसाठी काम केलेले आहे. त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूयात.
सलग दुसऱ्यांदा आमदारअग्निमित्रा पॉल यांनी 2026 च्या विधानसभा निवडणुकीत आसनसोल दक्षिण मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे. अग्निमित्रा पॉल यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1974 रोजी आसनसोल येथे झाला. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांच्या घरी लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्राचे वातावरण होते. त्यांचे वडील डॉक्टर अशोक रॉय हे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ होते. घरच्यांची इच्छा होती की त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे. त्यांनी दोन वेळा JEE परीक्षा दिली होती. त्यांना डेंटिस्ट्रीसाठी प्रवेशही मिळाला होता. मात्र त्यांनी बॉटनीमध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर मॅनेजमेंट तसेच फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेऊन त्यातच करिअर केले.
श्रीदेवी आणि मिथुन यांच्या आवडत्या डिझायनरअग्निमित्रा पॉल यांनी फॅशन डिझायनिंग क्षेत्रात मोठे यश मिळवले. 1990 च्या दशकाच्या शेवटी त्या कोलकात्यातील प्रसिद्ध डिझायनर बनल्या. त्यांनी इंगा नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला, जो अनेक शहरांमध्ये लोकप्रिय झाला. त्यांनी बॉलिवूडच्या कोई मेरे दिल से पुछे आणि व्हाया दारिजिलिंग या चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केला होता. तसेच त्या श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, के के मेनन, इशा देओल या कलाकारांच्या फॅशन डिझायनर होत्या.
फॅशन डिझायनिंगमधून राजकारणात प्रवेशफॅशन क्षेत्रात नाव कमावल्यानंतर अग्निमित्रा पॉल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2020 मध्ये त्यांची पश्चिम बंगाल भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. महिलांसाठी काम करताना त्यांनी ‘उमा’ नावाची सेल्फ डिफेन्स कार्यशाळाही सुरू केली. 2021 मध्ये त्या पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर आमदार बनल्या आणि 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा मोठा विजय मिळवला.
दरम्यान, त्यांच्यावर एकूण 23 गुन्हे दाखल आहेत, हे सर्व गुन्हे त्या राजकारणात आल्यानंतर दाखल झाले आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकरणे आंदोलने आणि निदर्शनांशी संबंधित आहेत. मात्र, अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. आता त्या मंत्री म्हणून कसं काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.