रोखठोक – ‘सिस्टीम’चे पूर्ण गुन्हेगारीकरण! विरोधकांचा मेंदू हलला काय?
Marathi May 10, 2026 09:25 AM

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहून देशाला जाग येईल काय? प. बंगाल आणि आसामची निवडणूक भाजपने सरळ सरळ चोरली. ‘सिस्टीम’वर गुन्हेगारी डोक्याच्या लोकांनी ताबा मिळवला की, काय घडते याचे प्रात्यक्षिक प. बंगाल आणि आसाममध्ये दिसले. या प्रकाराने विरोधकांचा मेंदू हलला असेल तरच त्यांना शहाणपणा येईल!

राजकारण हा बदमाषांचा शेवटचा अड्डा आहे. प. बंगालात मोदी-शहा व त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली व ममता बॅनर्जी यांचा पराभव केला ते पाहून राजकारण हा बदमाषांचाच अड्डा आहे हे स्पष्ट झाले.

बदमाषांच्या हाती सत्तेची सूत्रे असतात तेव्हा संपूर्ण ‘सिस्टीम’ला गुन्हेगार बनवले जाते.

प. बंगाल आणि आसामात तेच घडलेले दिसत आहे.

राहुल गांधी हे विश्वास ठेवावा असे नेते आहेत. त्यांनी अत्यंत परखडपणे सांगितले, “आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुका या भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘हडप’ केल्या आहेत. बंगालमध्ये शंभरपेक्षा जास्तच जागा भाजपकडून बळकावण्यात आल्या. हीच पद्धत आपण यापूर्वीही पाहिली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्रातील 2024 च्या निवडणुका अशाच पद्धतीने चोरल्या. ‘सिस्टीम’ ताब्यात घेतली.” राहुल गांधी जे म्हणतात त्याचा सारांश शेवटी तोच आहे. भारताच्या सर्व संवैधानिक यंत्रणा (system) गुन्हेगारी टोळ्यांच्या ताब्यात गेल्या आहेत.

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी देशात खळबळ उडवली. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेणारे प्रादेशिक पक्ष व त्यांच्या नेत्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागला. प. बंगाल, तामीळनाडूत हे प्रामुख्याने घडले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या परंपरागत कोलाथूर मतदारसंघातील 1 लाख 2 हजार मते ‘SIR’ च्या नावाखाली उडवली. स्टॅलिन यांचा 8,795 मतांनी पराभव झाला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातील 51 हजार मते ‘SIR’ खाली उडवली. ममता 15 हजार मतांनी पराभूत झाल्या.

त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मतदारसंघातील 25 हजार मते रहस्यमयरीत्या कापली. केजरीवाल 15 हजार मतांनी पराभूत झाले. भाजपच्या राजकारणाचा हा गुन्हेगारी स्वरूपाचा पॅटर्न आहे.

बदल का घडले?

केरळात डाव्यांचे सरकार होते. तेथे सत्तांतर घडले. केरळात काँग्रेसची सत्ता आली. तामीळनाडूत द्रमुक, अण्णा द्रमुकला लोकांनी झिडकारले व अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाचा पर्याय निवडला. शंभरावर जागा या पक्षाने जिंकल्या. दक्षिणेतले कोणतेही दार भाजपसाठी उघडले नाही हे महत्त्वाचे, पण भाजपला आता दक्षिणेची गरज उरलेली नाही. तामीळनाडूतील ‘युवा’ मतदारांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला स्वीकारले. जुनाट ‘हिंदी’ विरोध, द्रविड अस्मिता वगैरे कल्पना नव्या पिढीने स्वीकारल्या नाहीत व मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करणाऱ्या स्टॅलिन यांनाही पराभव पत्करावा लागला. स्टॅलिन मोदी-शहांच्या भ्रष्ट, धार्मिक, द्वेषपूर्ण राजकारणाविरुद्ध ठाम भूमिका सतत घेत राहिले. भाजपच्या गुन्हेगारी ‘सिस्टीम’ने त्यांचा पराभव घडवून आणला. तामीळनाडूत आश्चर्य घडले ते असे की, ‘टीव्हीके’ पक्षाचे विजय (म्हणजे सी. जोसेफ विजय) हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे तामीळ जनतेने द्रविड अस्मितेचा मुद्दाच निकालात काढला. भाजपचे नकली हिंदुत्व आणि द्रविड अस्मितेच्या जाळ्यात न अडकता तामिळींनी विजय यांना भरघोस मतदान केले.

आसामात एका बेताल मुख्यमंत्र्यांचे राज्य पाच वर्षांपासून चालले आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांचे वर्तन लोकशाही, संस्कृतीला धरून कधीच नव्हते. त्यांच्या काळात ना आसामचा विकास झाला, ना आसामातील तरुणांना रोजगार मिळाला. तरीही त्यांचा व भाजपचा विजय झाला. आसामात त्यांच्या विरोधात जनमताचे वारे वाहत होते तरीही हे लोक जिंकतात कसे त्याचे उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे.

आसामात विजय चोरला. धर्म आणि धर्मांधतेचे विषच भाजपने आसामातही ओतले व लोकशाहीत शेवटी धर्माच्या आणि द्वेषाच्या राजकारणाचा विजय झाला.

धार्मिक ध्वज

प. बंगालमध्ये भाजपची ‘धर्मध्वजा’ फडकवण्याचे मोदी-शहांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. ‘धर्मध्वजा’ लोकशाहीच्या छाताडावर पाय ठेवून रोवली हे इथे लक्षात घेतले पाहिजे. देशातील विरोधी पक्षांचा संपूर्ण पराभव करण्याचा हा डाव आहे. रशियात पुतीन हे एकतर्फी विजय मिळवतात. पाकिस्तानातील निवडणुकांत कोणी जिंकायचे हे तेथील आयएसआय किंवा लष्कर प्रमुख ठरवतात. जगातील हुकूमशाही किंवा धार्मिक राष्ट्रात जे घडते तेच लोकशाहीच्या नावाखाली भारतात घडत आहे. हे कसे घडते? भारतात विरोधी पक्षांचा पराभव होत नाही, तर ‘सिस्टीम’चा विजय होत आहे. ही सिस्टीम गुन्हेगारी डोके असलेल्या (क्रिमिनल माइंडेड) व्यक्तींच्या हातात गेली तर देशाची लोकशाही, संविधान… सर्व काही पायदळी तुडवून तो वारंवार जिंकत जातो. दक्षिणेत द्रमुक आणि पूर्वेला तृणमूलला मार्गी लावून भाजपने विरोधकांचा काटा काढला. महाराष्ट्रात आधीच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस तोडून विरोधाची धार कमी केली. दिल्लीत केजरीवाल यांचा पराभव घडवून आणला. अण्णा द्रमुक, तेलुगू देसम, नितीश कुमार हे भाजपच्या खेळातले जोकर आधीच बनले आहेत. काँग्रेसमध्ये भाजपचे चमचे घुसल्याने ते राहुल गांधींची लढाई कमजोर करीत आहेत. राहुल गांधी यांनी ‘एसआयआर’ (SIR) विरुद्ध लढाई सुरू केली तेव्हा त्यांचे पाय खेचणारे कालच्या निकालांनंतर तरी शहाणे झाले असतील. ज्यांच्या नावावर लोक जिंकू शकतात अशा नेत्यांनाच हरवायचे व नेतृत्व नष्ट करायचे हे भाजपचे धोरण आहे. त्याच पद्धतीने अमेठीत राहुल गांधींचा पराभव केला गेला होता. मात्र त्यातून राहुल गांधी पुन्हा उभे राहिले. ‘एसआयआर’ हे नवे हत्यार आले, पण ईव्हीएम, रिटर्निंग ऑफिसर, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांना ‘मॅनेज’करून प्रमुख ‘जागा’ टार्गेट केल्या जातात व मोठ्या नेत्यांना पराभूत केले जाते. अधीररंजन चौधरी, गौरव गोगोई, स्टॅलिन, ममता बॅनर्जी यांना त्याच पद्धतीने हरवले गेले. आव्हान उभे करणारे नेतृत्व उभेच राहू नये व सर्व मैदान ‘अदानी’साठी साफ व्हावे हाच एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक आयोगाने या सगळ्यात लोकशाहीविरुद्ध भूमिका घेतली. प. बंगालात भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये विजयाचे अंतर सुमारे 32 लाख 11 हजार मतांचे आहे. SIR मध्ये वगळलेल्या 91 लाख मतांचा विचार केला तर प्रत्येक जागेवर सरासरी 30 हजार मतदारांची नावे कापली गेली. 176 जागांवरील भाजप-तृणमूल विजयाचे अंतर 30 हजारांपेक्षा कमी आहे, तर 117 जागांवर हा फरक 30 हजारांपेक्षा जास्त आहे. थोडक्यात, या 32 लाखांमुळे शंभरावर जागांचे ‘उलटफेर’ झाले. हे घडविण्यासाठी निवडणूक आयोगाने भाजपला मदत केली. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 91 लाख मतदारांमधील 27 लाख मतदार आपले नाव पुन्हा यादीत समाविष्ट होण्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. हे आकडे साधे नाहीत. हे आकडे व त्यामागची पटकथा गुंतागुंतीची आहे. ‘सरकारविरोधी हवा’, ‘लोकांना बदल हवा होता’, ‘भ्रष्टाचार आणि विकासाचा अभाव’ असे एक Perception तयार केले जाते, पण भाजपच्या विजयाची खरी कहाणी आकड्यांच्या या हेराफेरीत दडलेली आहे. बंगालात भाजपला 1.39 कोटी, तर तृणमूलला 1.27 कोटी मतदान झाले, पण त्यात शंभर जागांची पलटी झाली. हे आधीच ठरले होते.

राहुल गांधी काय म्हणाले?

प. बंगाल, आसामचा निकाल म्हणजे लोकशाहीविरुद्ध रचलेले व यशस्वी झालेले षड्यंत्र आहे. डिसेंबर 2025 च्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांनी याच षड्यंत्राचा बुरखा फाडला होता. या अधिवेशनात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग व SIR प्रक्रियेवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाच्या हातमिळवणीतून मतदार यादीत घोटाळे व मतचोरी होत आहे. चर्चेच्या वेळी राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रिया व निवड समितीतून भाजपच्या मुख्य न्यायाधीशांना वगळण्याच्या मुद्द्याला तोंड फोडले. निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि निवडणुकीत घोटाळ्यांवर संसदेत एक विस्तृत चर्चा व्हावी अशी मागणी राहुल गांधींची होती. त्या वेळी ममता बॅनर्जी व अखिलेश यादव यांनी राहुल गांधींना साथ दिली नाही. तृणमूल काँग्रेसचा मार्ग संसदेत अनेकदा काँग्रेसपेक्षा वेगळा दिसला. काँग्रेस अध्यक्ष खरगे व राहुल गांधी यांच्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारून वेगळ्याच विषयांवर चर्चा व आंदोलन भडकवण्यात त्यांना मजा वाटली. काँग्रेसच्या अनेक भूमिकांना त्यांनी विरोध केला. ममता बॅनर्जी यांच्या हटवादी स्वभावामुळे ‘इंडिया’ ब्लॉकमध्ये एकरूपता दिसली नाही. गांधी हे SIR वर चर्चा मागत होते आणि भाजपने ‘वंदे मातरम् 150 वर्षांचे झाले’ व इतर ऐतिहासिक मुद्द्यांवर चर्चा सुरू केली. त्यानंतर बरोबर पाच महिन्यांनी ममता बॅनर्जी त्याच ‘SIR’ मुद्दय़ावर निवडणूक हरल्या आहेत.

पाच राज्यांच्या निकालांमुळे देशातील विरोधकांचा ‘मेंदू’ हलला असेल तर शहाणपण येईल. राज्यात महाविकास आघाडी व देशात ‘इंडिया ब्लॉक’चे महत्त्व उरले नाही असे ज्या भाजप चमच्यांना (विरोधी पक्षांतील) वाटते ते भारतीय लोकशाही व संविधानाशी बेइमानी करत आहेत.

इतिहास त्यांना माफ करणार नाही.

देशाला राष्ट्रगीत देणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांच्या `where the mind is without fear’ म्हणजे ‘जिथे मन निर्भय असेल’ या कवितेत शेवटी टागोर म्हणतात,

“स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात,
हे माझ्या पित्या,
माझ्या देशाला जाग येवो!”

पारतंत्र्यात लिहिलेली ही कविता आजही तशीच लागू पडते. देशाला जाग येवो!

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.