राज्यासह संपूर्ण देशात गेल्या काही काळापासून अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या बुलेटिनमध्ये उत्तर-पश्चिम भारतात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या काही भागात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली-एनसीआरमध्येही ढगाळ वातावरण, जोरदार वारे आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. असं असलं तरी राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांत उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि मध्य भारतातही पावसाची शक्यतापूर्व आणि मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशाराही देण्यात आला आहे. झारखंड आणि ओडिशामध्ये काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्येही ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण भारतात कसे असेल हवामान?दक्षिण भारतातील तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जनेसह वातावरण राहण्याचा अंदाज आहे. किनारपट्टी भागातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. तेलंगणामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नॉर्थईस्टमध्ये कसं असेल हवामान?आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी जारदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मेघालय आणि आसाममधील काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने या काळात झाडे आणि वीज खांबांपासून दूर राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.