Nagpur News: पोटासाठी सोसावे लागताहेत उन्हाचे चटके; गावखेड्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचा गावरान आंबे विकून उदरनिर्वाह
esakal May 11, 2026 01:45 PM

नागपूर: चार-दोन पैसे जास्त मिळावेत, या उद्देशाने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी सध्या शहराकडे धाव घेऊन गावरान आंबे विकत असल्याचे चित्र जपानी गार्डनजवळ पाहायला मिळत आहे. कॉटन मार्केट किंवा कळमना बाजारापेक्षा रस्त्यावर चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात आहे.

मात्र, पोटासाठी त्यांना ४५ डिग्रीत उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. शहरात संत्रा मार्केट आणि कळमना बाजार फळांचे मोठे मार्केट आहेत. मात्र, या ठिकाणी दलाली, हमाली, टॅक्स, वाहतूक व अन्य खर्च अधिक येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

Nagpur News: दंतच्या सुपर स्पेशालिटीसाठी आणखी किती प्रतीक्षा?;इमारतीचे काम पूर्ण ; यंत्रांच्या उपलब्धतेला होतोय विलंब

त्यामुळे अनेकांनी भर रस्त्यावर आंबे विकण्याचा पर्याय निवडला आहे. सिव्हिल लाइन्समधील जपानी गार्डन परिसर सध्या या शेतकऱ्यांचे कमाईचे स्थळ बनले आहे. शहरालगतच्या कळमेश्वर, येरला, भारसवाडा, धापेवाडा, सावनेर, देवलापार, कन्हान इत्यादी भागातील शेतकरी दररोज सायकल व दुचाकीने पायपीट करत सकाळपासून रात्रीपर्यंत उन्हातान्हात रस्त्यांवर गावरान आंबे विकताना दिसत आहेत.

कमी दरात गावरान चव

यासंदर्भात ‘सकाळ’ने काही आंबे उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता ते म्हणाले, मालक आणि ग्राहकांचा थेट संबंध येत असल्यामुळे कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. आंबे दहा-पाच रुपयांनी स्वस्त विकले तरीही चांगली कमाई होते. ग्राहकांनाही कमी पैशात चविष्ट गावरान आंबे खायला मिळत आहेत. तसेही हापूस आंबे महागडे असून, गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांच्याही आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे इच्छा असूनही हे आंबे खरेदी करण्याची सहसा हिंमत होत नाही. अशा परिस्थितीत अनेक जण गावरान आंब्यांवर हापूसची भूक भागवीत आहेत.

Premium : Indian Premier League, क्रिकेटची 'इको सिस्टिम' बिघडवणारी 'एंटरटेनमेंट फॅक्टरी'? Expert Opinion

"मी व माझे अनेक सहकारी दररोज दुचाकीने नागपुरात येऊन सायंकाळपर्यंत गावरान आंबे विकतो. सध्या नागपूर व विदर्भातील शहरांचे तापमान ४५ डिग्रीच्या आसपास आहे. त्यामुळे झाडाखाली बसूनही चटके व उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागतात. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही."

-शामराव राऊत,

आंबेविक्रेते शेतकरी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.