Petrol-Diesel Price : भारतात 15 मे च्या आधी पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी वाढतील? LPG सिलेंडरचे दर तर बाबा विचारुच नका
Tv9 Marathi May 11, 2026 02:45 PM

अमेरिका-इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागितक तेल पुरवठा बाधित झाला आहे. पण अजूनपर्यंत भारतीयांना थेट या युद्धाची झळ पोहोचलेली नाहीय. पण ती लवकरच बसू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तेलंगण येथे एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना काही महत्वाची आवाहनं केली आहेत. यात पेट्रोल-डिझेलचा जपून वापर करा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्या अशी काही महत्वाची आवाहनं पंतप्रधानांनी केली आहेत. पंतप्रधानांची ही आवाहनं म्हणजे तेल संकटाचे संकेत मानले जात आहेत. भारताला तेल, नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. युद्धामुळे कच्चा तेलाच्या किंमती भडकत चालल्या आहेत. परिणामी परकीय चलन जास्त प्रमाणात खर्च करावं लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.

अजूनपर्यंत तरी सरकारनेपेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवल्या नव्हत्या. हे दर स्थिर होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका हे सुद्धा एक कारण होतं. आता 15 मे पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती देशभरात वाढू शकतात. कारण तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती वाढत असल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना दर महिन्याला जवळपास 30 हजार कोटी रुपयांचं नुकसान सोसाव लागत आहे. इंडिया टुडे टीवीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

तेलाची किंमत 126 बॅरल प्रति डॉलर

प्रति बॅरल 70 डॉलर असणारे तेलाचे दर मागच्या काही दिवसात 126 बॅरल प्रति डॉलरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये बाधित झालेली जल वाहतूक आणि आखाती देशांच्या तेल प्रकल्पांवर इराणने केलेले हल्ले हे तेलाचे दर वाढण्यामागचं प्रमुख कारण आहे. सध्या इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूंनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची नाकेबंदी करण्यात आली आहे. याची किंमत भारतासह अनेक देशांना चुकवावी लागत असून तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. हॉर्मुजमधून जगाची 20 टक्के तेल वाहतूक होते. इराणकडून या भागातून जाणाऱ्या तेल जहाजांवर हल्ले सुरु आहेत. सरकारने दरवाढीला परवानगी दिली, तर भारतात प्रति लिटर पेट्रोल-डिझेल 4 ते 5 रुपयांनी महाग होऊ शकते. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 40 ते 50 रुपये वाढ होऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.