What Did SIT Ask Rupali Chakankar in Kharat Case भोंदू अशोक खरात याच्या महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांसह बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी करीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. चौकशीनंतर पुण्याकडे रवाना होताना चाकणकर यांनी, चौकशीत समाधानकारक उत्तरे दिल्याचे सांगत विचारलेल्या प्रश्नांबद्दल माहिती देणे मात्र टाळले. दरम्यान, 'एसआयटी'कडून चाकणकर यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
भोंदू अशोक खरात यास महिलांवरील अत्याचार, फसवणूक व बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. खरातच्या मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त असलेल्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांना एसआयटीने रविवारी चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार चाकणकर दुपारी साडेबाराच्या सुमारास महाराष्ट्र पोलिस अकादमीतील एसआयटीच्या कार्यालयात महिला वकिलांसह पोहोचल्या. सुमारे पाच ते साडेपाच तासांच्या एसआयटीच्या चौकशीनंतर सायंकाळी त्या पोलिस अकादमीतून बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांचा ताफा थेट पुण्याच्या दिशेने रवाना झाला.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी, पुलाखाली ट्रक अडकल्यानं वाहनांच्या रांगा ४५ प्रश्नांचा भडिमाररूपाली चाकणकर यांची भोंदू खरात याच्याशी कधी ओळख झाली, शिवनिका संस्थानवर त्यांनी किती वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले, संस्थानच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना किती माहिती आहे, खरातला भेटण्यासाठी कोणकोणते राजकीय नेते आले, त्यांनी कोणत्या स्वरूपाच्या पूजाविधी केल्या चाकणकर यांचे खरातसोबतचे व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ कधीचे, त्या करीत असलेल्या पूजाविधी कोणत्या, त्या पूजाविधी कशासाठी केल्या, खरातच्या आर्थिक व्यवहारांशी त्यांचा काय संबंध, खरातच्या प्रकरणात चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला का, या अन् अशा सुमारे ४५ पेक्षा अधिक प्रश्नांचा भडिमार चाकणकर यांच्यावर करण्यात आला. एसआयटीच्या प्रमुख महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते, सहायक पोलिस आयुक्त अमोल भारती यांनी रूपाली चाकणकर यांची कसून चौकशी केली.
अडचणी वाढण्याची शक्यतारूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची यापूर्वीच शिर्डी पोलिसांनी खरातशी असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांशी कसून चौकशी केली आहे. त्यापाठोपाठ रूपाली चाकणकर यांना नोटीस बजावली. रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना खरातला वाचविण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा असून, त्या अनुषंगाने एसआयटीच्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचे समजते. त्याअनुषंगाने चाकणकर यांची कसून चौकशी करण्यात आली असून, त्याबाबत त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याचीच शक्यता असून, त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
असे होते प्रश्न
खरातला वाचविण्यासाठी पदाचा गैरवापर
शिवनिका संस्थानवर विश्वस्त असताना आर्थिक व्यवहार
खरातच्या मंदिरात कोणत्या स्वरूपाच्या पूजाविधी ?
आपण कोणत्या पूजाविधी केल्या?
व्हायरल फोटो, व्हिडिओचा संबंध काय
खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांशी आपला संबंध काय ?
खरातचे राजकीय नेत्यांशी संबंध
शिवनिका ट्रस्ट, पतसंस्थांतील गैरव्यवहारांबाबत
एसआयटी प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य असेल. पुन्हा गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहीन. चौकशी अहवालातून काय ते समोर येईलच. - रूपाली चाकणकर, माजी अध्यक्षा, राज्य महिला आयोग