पुणे : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज (सोमवारी) दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. मागण्या पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ एका युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Crime News) आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर चढून बसल्याने (Pune Crime News) परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ धाव घेत युवकाची सुखरूप सुटका केली. (Pune Crime News)
राम पाचकाळ असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजगड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण सुरू असताना राम पाचकाळ हे त्याचा व्हिडीओ चित्रीकरण करत होते. त्यावेळी काही जणांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यासाठी आले होते.(Pune Crime News)
मात्र, मागणीवर तत्काळ कारवाई होत नसल्याची भावना झाल्याने राम पाचकाळ यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिसर बंदिस्त केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने युवकाला जाळीवरून खाली उतरवण्यात आले.(Pune Crime News)
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. युवकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. तसेच त्याने केलेल्या आरोपांबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. आंदोलनासाठी आलेल्या व्यक्तीने थेट पाचव्या मजल्यावरील जाळीवर चढत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे.