खारेपाटण, वैभववाडी परिसराला चक्रीवादळाचा तडाखा
--
अनेक घरांची पडझड; लाखोंचे नुकसान
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील खारेपाटण आणि वैभववाडी तालुक्यात शनिवारी झालेल्या चक्रीवादळामुळे मोठी पडझड झाली. शेकडो घरांच्या छप्परांचे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचा तडाखा सुरू आहे. शनिवारी खारेपाटण, आखवणे पुनर्वसन गावठाण, मांगवली, वेंगसर, जानवली या परिसराला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. सर्वाधिक नुकसान खारेपाटण आणि आखवणे पुनर्वसन गावठाणात झाले.
खारेपाटण शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांची कौले, तसेच सिमेंट पत्रे वाऱ्याने उडून गेले. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने खारेपाटणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खारेपाटण परिसरातील ३० हून अधिक घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. आखवणे पुनर्वसन गावठाणात २५ घरांचे नुकसान झाले. याशिवाय वेंगसर, मांगवली, तिथवली परिसरात १६ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसामुळे शेकडो मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार दहा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस विजेचे खांब उभे करणे, तुटलेल्या वीजवाहिन्या जोडणे आदी कामे सुरू आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तापमानात वाढ झाली असून, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.
फोटो ओळ : खारेपाटण परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले. या वादळात खारेपाटण येथील अनेक वर्षांचे उत्पादनक्षम फणसाचे झाड मोडले.