काजू उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण ठरविण्याचा निर्णय
--
काजू उद्योग विकास समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
--
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : कोकणातील काजू उद्योगासमोरील विविध आव्हाने निश्चित करून त्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा निर्णय काजू उद्योग विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
काजू उद्योग विकास समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला काजू बोर्डाचे डॉ. परशुराम पाटील, विनायक कोकरे, सहाय्यक सरव्यवस्थापक महेंद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे, सुनील मरबळ, समिती सचिव मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
बैठकीत कोकणातील काजू उद्योगासमोरील अडचणी, खेळत्या भांडवलाची समस्या, दर्जेदार कच्च्या मालाचा अनियमित पुरवठा, काजू उत्पादनवाढ, काजू बी खरेदी, साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता, तसेच काजूला जीआय मानांकन मिळवून देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सर्व विषयांवर काम करण्यासाठी काजू उद्योग विकास समितीची स्थापना करण्यात आली असून, उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी व्यापक धोरण आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. समितीकडून तयार करण्यात येणाऱ्या धोरणाची शासनस्तरावर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीला जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.