देशात खरच पेट्रोल डिझेलची कमतरता भासणार का? किती आहे साठा? पंतप्रधान मोदींच्या आवाहानानंतर सरकारकडून महत्वाचं निवेदन जारी
एबीपी माझा वेब टीम May 11, 2026 07:43 PM

Petrol Diesel Price News :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यानंतर केंद्र सरकारनं आज देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाची कोणतीही कमतरता नसल्याची माहिती दिली आहे. 

भारताकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध

पश्चिम आशियातील परिस्थितीवर आंतर-मंत्रालयीन गटाच्या (IGoM) बैठकीदरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताकडे पुरेसा इंधनसाठा आहे आणि या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. देश सुरक्षित असून कोणत्याही पेट्रोलियम उत्पादनांची कमतरता नाही, अशी माहिती आंतर-मंत्रालयीन गटाला देण्यात आली, तर दुसरीकडे बहुतेक इतर देशांनी देशांतर्गत वापर लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा, 60 दिवसांचा नैसर्गिक वायूचा आणि 45 दिवसांचा एलपीजीचा साठा आहे. परकीय चलन साठा 7.3 अब्ज डॉलर्सच्या समाधानकारक पातळीवर असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा चौथा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. तो 150 हून अधिक देशांना निर्यात करतो आणि देशांतर्गत मागणी पूर्णपणे भागवतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढलेल्या असल्याने देशाला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.

देशावरील सध्याचा आणि भविष्यातील आर्थिक भार कमी करण्यासाठी इंधनाचा गरजेनुसार वापर करण्याचं आवाहन

इंधनाची बचत हा भार कमी करु शकते. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे वाढणाऱ्या किमतींचा सामना करण्यासाठी देशाला मदत करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सामूहिक सहभागाचे आवाहन केले आहे. त्यामुळे, देशावरील सध्याचा आणि भविष्यातील आर्थिक भार कमी करण्यासाठी त्यांनी पेट्रोलियम उत्पादनांचा गरजेनुसार वापर आणि अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. संघर्ष सुरू झाल्यानंतर 70 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी, या जागतिक अस्थिरतेच्या काळात पेट्रोलियमच्या किमती स्थिर राहिलेल्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

नेमकं काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. पंतप्रधान हैदराबादमध्ये म्हणाले की, आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. ते म्हणाले की, ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे, तिथे लोकांनी तिचा वापर करावा. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमसारख्या उपायांची गरज आहे.

पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.