सोनं खरेदी करू नका म्हणताच सरकारला मोठा विरोध, 3 कोटी कारागिरांचं काय होणार? चिंता वाढली!
Tv9 Marathi May 11, 2026 08:45 PM

Narendra Modi Gold Comment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरासाठी कोणीही सोनं खरेदी करू नका, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींचा हा नाकर्तेपणा आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. मोदींच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सराफा बाजारातील लोकांची गर्दी कमी झाली आहे. सोबतच सोन्याचा भावही घसरला आहे. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर आता सराफा व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मोदींच्या या आवाहनाला सराफा व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.

सोन्याच्या दुकानात शुकशुकाट

मोदींनी सोने खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर सोन्याचा भाव घसरला आहे. सराफा व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पुण्याच्या राजगुरू नगरातील सराफा बाजारात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सध्या लग्नसराई आहे. तरीही दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसत नाहीये. पुण्यातील सराफा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास पुण्याच्या सराफा असोशिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगीळ म्हणाले आहेत. व्यापाऱ्यांत कोणताही संभ्रम नाही. लोक सोनं खरेदी करतील, असेही ते म्हणाले.

तीन कोटी कारागिरांच्या रोजगारावर गंडांतर

दुसरीकडे ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह असणाऱ्या 3 कोटी कारागीरांचं काय होणार, असा सवाल ऑल इंडिया ज्वेलर्स असोशिएशनकडून उपस्थित करण्यात आला आहे. भारतात दागिन्यांच्या घडणावळीचे काम करणारे तीन कोटी कारागीर आहेत. ते काम कुठे करणार. मुंबईत एकूण 15 हजार ज्वेलर्स आहेत, त्यांचे काय होणार? सवाल ऑल इंडिया ज्वेलर्स असोशिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी केला आहे. देशभक्त आम्ही पण आहोत. पण कोणाची रोजीरोटी जायला नको, असे आमचे मत असल्याचे जैन यांनी सांगितले.

कारागिरांनी नेमकं कसं जगायचं?

लोकांनी सोनं खरेदी बंद केलं तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर गंडांतर येईल, असं मत नागपूरच्या ऑल इंडिया जेम अॅप ज्वेलरचे राजेश रोकडे यांनी व्यक्त केले आहे. सोलापुरातही मोदींच्या आवाहनला सराफा व्यवसायिकांनी विरोध केला आहे. वर्षभर सोनं विकलं नाही तरीही सोन्याचे व्यापारी जगू शकतील. मात्र कारागिरांनी कसं जगायचं, असा सवाल सराफा व्यापारी करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.