खाडीपात्रातील प्रदूषणावर तोडगा
वसई-विरार पालिका मैलाप्रक्रिया प्रकल्प उभारणार
विरार, ता. ११ (बातमीदार)ः वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेसाठी पालिकेने खाडीत सोडल्या जाणाऱ्या मैल्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. नवघर येथील सहा एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार असून, सात ते आठ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
वसई-विरार शहरात २२५ किलोमीटर लांबीची गटारे असून, त्यावर एक लाखांहून अधिक झाकणे आहेत. मात्र, प्लॅस्टिक कचरा, साचलेल्या गाळामुळे पावसाळ्यात गटारे तुंबतात. त्यामुळे दरवर्षी शहरात पूरस्थिती निर्माण होते. तसेच रस्त्याच्या कडेला टाकलेला गाळ खाडीपात्रात जात असल्याने वाढणाऱ्या प्रदूषणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आधुनिक यंत्राचा वापर करून स्वच्छतेवर भर दिला आहे. यापूर्वी गटार किंवा शौचालयांच्या टाक्यांमधील गाळ थेट खाडीत सोडला जात असल्याच्या तक्रारी होत्या, पण आता मैला प्रक्रिया प्रकल्पात (एफएसटीपी) प्रक्रियेनंतर खाडीपात्रात विसर्जित केला जाणार आहे.
—-----------------------------------
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
नवघर येथे सहा एकर जागेवर हा प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतर तत्त्वावर असून, मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम, कार्यान्वयन तसेच देखभाल सात वर्षांसाठी मे. आर एन बी इन्फ्रा कंपनीकडे असणार आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी पालिकेला आशा आहे.
—----------------------------------------------
प्रदूषण रोखण्यास मदत
वसई-विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात खाड्या आहेत. शहरातील सांडपाणी, इतर कंपन्यांमधून निघणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून जाते. अशा प्रकारच्या सांडपाण्यामुळे येथील खाड्या प्रदूषित होत आहेत. यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अंतर्गत गटारांच्या मैल्यावर प्रक्रियेमुळे खाडीपात्र स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
-------------------------
गटारातील निघणाऱ्या गाळावर प्रक्रिया करण्यासाठी एफएसटीपी प्रकल्प उभारला जाणार आहे. नवघर येथे जागा शोधली आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू होईल.
- जितेंद्र नाईक, सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)