Iran And America War : मध्य आशियातील तणाव अजूनही निवळलेला नाही. इराणने नुकतेच अमेरिकेला एक नवा शांतता प्रस्ताव सादर केला होता. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो थेट फेटाळून लावला आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात अजूनही शस्त्रसंधी कायम आहे. परंतु तरीदेखील त्यांच्यातील तणाव कायम असून दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करण्यासाठी सज्ज आहेत. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. युरेनियमच्या साठ्यामुले ट्रम्प यांनी इराणला ही धमकी दिली असल्याने जगाची चिंता वाढली आहे.
इराणकडे असलेल्या युरेनियमच्या साठ्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या युरेनियमचा वापर अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी व्हायला नको, अशी अमेरिकेची भूमिका आहे. याच भूमिकेतून ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमच्या साठ्याकडे कोणी जाण्याची हिंमत केली तर आम्ही त्याला थेट उडवून टाकू, असं ट्रम्प म्हणाले आहेत. इराणकडे असलेल्या या युरेनियमच्या साठ्याकडे अमेरिकेचे लक्ष आहे. त्या ठिकाणावर कोणीही जाऊ नये. तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.
इराणच्या युरेनियमच्या साठ्याकडे आमचे सैन्य लक्ष ठेवून आहेत. स्पेस फोर्स नावाची एक संस्था आम्ही स्थान केलेली आहे. इराणच्या युरेनियमवर या संस्थेच्या माध्यमातून लक्षठेवले जात आहे. त्या जागेवर कोणी पोहोचले तर आम्हाला लगेच समजते. युरेनियमच्या साठ्याजवळ कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या या स्पेस फोर्सला सगळं समजतं. त्या ठिकाणावर जाणाऱ्याचे नाव, पत्ता, बॅच नंबर असं सगळं आम्हाला लगेच समजून येतं, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या धमकीनंतर आता इराण नेमकी काय भूमिका घेणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला इराण प्रत्युत्तर देणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.