सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
एबीपी माझा ब्युरो May 12, 2026 12:43 AM

कोलकाता : सरकार जाताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुजीत बोस (Sujit Bose) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कथित नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर सॉल्ट लेक येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील ईडी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

Municipality Recruitment Scam : 200 कोटींच्या कथित भरती घोटाळ्यात कारवाई

सुजीत बोस सोमवारी सकाळी आपल्या मुलगा समुद्र बोस याच्यासह ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. दक्षिण दमदम नगरपालिकेतील भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेच्या तपासाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे घेतल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात विविध नगरपालिकांमध्ये 1,800 हून अधिक बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्याचा आणि त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

ED Investigation West Bengal : बोस कुटुंबाच्या ठिकाणी दोनदा छापे

तपासादरम्यान ईडीने यापूर्वी सुजीत बोस, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना अनेक वेळा समन्स बजावले होते. तसेच त्यांच्या निवासस्थानासह कार्यालय आणि व्हीआयपी रोडजवळील मुलाच्या रेस्टॉरंटवर दोनदा छापेमारी करण्यात आली होती. तपास यंत्रणेला या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

West Bengal Politics : निवडणुकीदरम्यानही ईडीची नोटीस

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळातही सुजीत बोस यांना ईडीकडून अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. नामांकन दाखल करण्याच्या दिवशीही त्यांना समन्स देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारामुळे हजर राहता येणार नसल्याचे सांगत कोलकाता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) याचिका दाखल केली होती.

TMC Reaction : कारवाईनंतर टीएमसीचा आरोप

सुजीत बोस यांनी यापूर्वी या तपासावर टीका करत ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला होता. नोकऱ्या विकून पैसे कमावण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही. हे ईडी आणि निवडणूक आयोगाचे षडयंत्र आहे, असं त्यांनी म्हटले होते. मात्र ईडीने आर्थिक गैरव्यवहाराच्या ठोस पुराव्यांच्या आधारे ही अटक केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांची तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवत भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचे शुभेंदु अधिकारी हे मुख्यमंत्री बनले आहेत.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.