सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप
esakal May 12, 2026 10:45 PM

सामायिक सातबाराधारक शेतकऱ्यांना सौर कृषीपंप
शासननिर्णय; महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : जिल्ह्यातील शेती आणि बागायतीला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेत आता एक मोठा बदल करण्यात आला असून, यापूर्वी केवळ स्वतंत्र सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ आता सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही घेता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जमिनीतील सर्व भागधारकांची लेखी संमती असणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक हिस्सेदाराने लेखी स्वरूपात नाहरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना अर्जदाराला २०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर कायदेशीर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
शेतकऱ्यांनी या योजनेसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahadiscom.in ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची रीतसर पडताळणी झाल्यानंतरच पंपाला मंजुरी देण्यात येणार आहे. सौर कृषीपंप योजनेमुळे विजेवरील अवलंबित्व कमी होणार असून, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होईल. सामायिक सातबाराच्या निर्णयामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेच्या कक्षेत येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
----
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
* जमिनीचा अद्ययावत सातबारा उतारा
* आधारकार्ड
* बँक पासबुकची छायांकित प्रत
* सातबारावर विहीर, बोअरवेल, शेततळे असे पाण्याचा स्रोत आवश्यक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.