Paydhooni Family Death : कलिंगड खाऊन नव्हे तर… पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, कशामुळे गेला जीव ?
Tv9 Marathi May 20, 2026 03:45 PM

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील पायुधीन येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डोकडिया कुटुंबातील व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं, मात्र पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणांत संपलं. अवघ्या काही वेळात चौघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे आई-वडील आणि दोनी मुलींचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि एकच दहशत माजली. याच प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असून आता या केसमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट आला आहे. समोर आलेल्या नव्या माहितीमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

कलिंगड खाऊन नव्हे तर…

डोकडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर तपास सुरू करण्यात आला, त्यावेळी त्यांच्या घरातून अनेक गोष्टी, नमुने पुरावे म्हणून जप्त करण्यात आले होते, ज्यांची तपासणी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले मिठाचे नमुने देखील एफएसएल चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. झिंक फॉस्फाइड मिश्रित मीठ हे कलिंगडावर लावण्यात आलं असावं असा संशय पोलसांना आहे.

मात्र डोकडिया कुटुंबाच्या घरात कुठेही झिंक फॉस्फाइड न सापडल्याने, ते नेमकं आलं कुठून असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे झिंक फॉस्फाइडच्या स्रोताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. डोकडिया कुटुंबातील चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइडनेच झाला, असं सर जे जे रुग्णालयाच्या अहवालात समोर आलं आहे. तर चौघांच्याही शरीरातून तसेच कलिंगडावर देखील झिंक फॉस्फाइड आढळलं होत.

काय आहे प्रकरण ?

25 एप्रिल रोजी ही दुर्दैवी घटना घडली. पायधुनी येथे राहणाऱ्या डोकडिया कुटुंबाने रात्री १०.३० च्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते. या जेवणात बिर्याणीचा बेत होता. हे जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री 1 ते 1.30 च्या सुमारास कुटुंबातील या चारही सदस्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र अवघ्या काही तासांतच या चौघांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. यानंतर २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर थोड्याच वेळात चौघांचाही मृत्यू झाला. सर्वात आधी लहान मुलीचा सकाळी10.15 वाजता मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात पत्नी आणि मोठी मुलगी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांनीही प्राण सोडले. याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून रोज नवनवी माहिती उघड होत आहे. मृतांचा मेंदू, यकृत आणि मूत्रपिंडांच्या नमुन्यांमध्ये हिरवट रंग दिसून आल्याचं हिस्टोपॅथॉलॉजी अहवालात स्पष्ट झालं होते. त्यावरून संशय बळावला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.