राष्ट्रवादी प्रबोध डावखरे भाजपचे नेते आणि निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. प्रबोध डावखरे (Prabodh Davkhare) यांनी बुधवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics News)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत केले. पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. वसंत डावखरे आजात शत्रू होते. कुठेही शत्रुत्वाची भावना नव्हती. त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे आज आपल्या पक्षात येत आहेत. प्रबोध आणि त्यांचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आले आहेत. ते उत्तम व्यावसायिक आहे. त्यांच्या जिम आहेत आणि आता ते सोबत येत आहेत. या पक्षात चांगली वागणूक मिळेल कुठेही कमी जास्त अशी वागणूक असणार नाही. ते मजबुतीने काम करतील. ज्या अडचणी असतील त्या सांगत चला, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
प्रबोध वसंतराव डावखरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावतीने स्वागत करतो. प्रबोध डावखरे हे व्यावसायिक आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात 30 जिम ते चालवतात. त्यांच्या वडिलांच्या विचाराचा धागा पकडून आता ते पुढे जात आहेत. डावखरे यांचं गाव शिरूर तालुक्यातील हिवरे हे गाव आहे. तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केलं होतं. विधान परिषद उपसभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं. डावखरे यांना मानणारा वर्ग ठाणे जिल्ह्यात आहेत. पक्षाचे संघटन प्रबोध डावखरे करतील, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
NCP Thane News: प्रबोध डावखरेंनी सांगितला वडिलांचा किस्सा अन् राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागील कारण
माझ्या जीवनातील महत्वाचा दिवस आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर ज्या पक्षासाठी कष्ट केले, त्या पक्षात मी आज प्रवेश करत आहे. रुग्णालयात असताना माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की, ज्यावेळी तुला वाटेल राजकारणात जायचं असेल तेव्हा, राष्ट्रवादीत जा. त्यानुसार आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. माझ्या वडिलांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला. मी त्यांचा हा वारसा पुढे नेईल, असे प्रबोध डावखरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा