महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे (Prabodh Davkhare) यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. प्रबोध डावखरे यांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे ठाण्याच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या डावखरे कुटुंबात आता उघडपणे राजकीय फूट पडल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रबोध डावखरे अत्यंत भावूक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडील दिवंगत वसंतराव डावखरे यांनी आयुष्यभर ज्या पक्षासाठी अपार कष्ट उपसले, त्याच पक्षात मी आज प्रवेश करत आहे. वडील जेव्हा रुग्णालयात होते, तेव्हा त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की, ‘जेव्हा कधी तुला राजकारणात जावंसं वाटेल, तेव्हा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जा!’ त्यांच्या याच अंतिम इच्छेनुसार आणि शब्दाखातर मी आज पक्षात आलो आहे. वडिलांनी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला, आता तोच वारसा मी पुढे नेणार आहे.
“पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल”
प्रबोध डावखरे यांचे पक्षात स्वागत करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, दिवंगत वसंत डावखरे हे राजकारणातील ‘अजातशत्रू’ नेते होते, त्यांचा कोणाशीही आकस किंवा शत्रुत्व नव्हते. आज त्यांचे चिरंजीव प्रबोध आपल्या पक्षात येत आहेत. प्रबोध हे एक उत्तम व्यावसायिक असून त्यांचे मोठे नेटवर्क आहे. या पक्षात त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अत्यंत आदराची आणि सन्मानाची वागणूक दिली जाईल. ते पक्षाचे काम मजबुतीने पुढे नेतील, यात शंका नाही.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी प्रबोध डावखरे यांच्या राजकीय आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वतीने मी प्रबोध यांचे स्वागत करतो. डावखरे कुटुंब मूळचे शिरूर तालुक्यातील हिवरे गावचे आहे. वसंतराव डावखरे यांनी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून प्रदीर्घ काळ उत्तम काम केले होते. ठाणे जिल्ह्यात डावखरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. प्रबोध डावखरे हे यशस्वी व्यावसायिक असून महाराष्ट्रात त्यांच्या 30 जिम आहेत. वडिलांच्या विचारांचा धागा पकडून ते आता पुढे जात असून, त्यांच्या येण्याने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटन अधिक मजबूत होईल.