Nagpur Crime : सिगारेट पिताना पाय लागल्याचा वाद रक्तरंजित; २८ वर्षीयाचा मृत्यू
esakal May 21, 2026 03:45 AM

नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भारत फर्निचरजवळ पानठेल्यावर सिगारेट पीत असताना, एकाला पाय लागल्याने झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर खुनात झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

शुभम राजेश बेसरे (वय २८, रा. शिवकृष्णधाम, वॉक्स कुलर मागे, कोराडी) असे मृताचे नाव असून अतुल बलराम ईवनाते (वय २५) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षल तेजराम नारे (वय २४, रा. जिओ पेट्रोल पंपामागे, दहेगाव, जि. नागपूर), व्यंकटेश विक्रम बडेल (वय २२, रा. मिसाळ ले-आऊट, जरीपटका, नागपूर) आणि एका अल्पवयीन असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुभम हा हातमजुरी करीत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री दीडच्या सुमारास नागपूर-कोराडी सर्व्हिस रोडलगत भारत फर्निचरजवळ शुभम आणि अतुल ईवनाते हे परिसरातील पानठेल्यावर सिगारेट पीत होते. तिथे एनपीडीएच्या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आलेला तेजस ऊर्फ कोला प्रमोद झोडापे (वय२२, रा. तपोवन ले-आऊट, स्मृतीनगर, कोराडी) हा हर्षल आणि पियुष यांच्यासह उभा होता. सिगारेट पिताना शुभमचा पाय तेजसला लागला. यातून तेजसने त्याचेशी वाद घातला.

काही वेळानंतर दोघांमधला वाद संपुष्टात आला. मात्र, तेजसने फोन करून त्याचे साथीदार मयंक मुन्ना मनपे (वय २१), प्रिन्स उर्फ तृषीत संजय चावरे (वय २०), मोहित धिरज रामटेके (वय२२), पियुष अतुल डोंगरे (वय २०, चौघेही रा. मिसाळ ले-आऊट, जरीपटका) यांना फोन करून बोलाविले. दरम्यान दोघे घरी जात असताना, आठ जणांनी पानठेल्यावर झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून दगड, धारदार चाकू आणि लाकडी दांड्याने दोघांवर हल्ला केला.

शुभमच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांना मेयो रुग्णालयात दाखल केले. यावेळी शुभमला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अतुलची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत, तपास करीत, हर्षल नारे, व्यंकटेश बडेल यांना अटक करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.