Wardha Heatwave Update: वर्धा सर्वात 'हॉट' शहर; पारा ४७.१ अंशांवर, पुढील २४ तास आणखी भयानक असण्याची शक्यता
esakal May 21, 2026 03:45 AM

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह संपूर्ण राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. यातच आता वर्धा शहर देशातील सर्वात उष्ण शहर म्हणून नोंदवले गेले आहे. मध्यंतरी सलग दोन दिवस येथील तापमान ४६ ते ४६.५ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. मात्र, बुधवारी तापमानाने नवीन उच्चांक गाठत ४७.१ अंश सेल्सिअसची नाेंद केली. या प्रचंड उन्हामुळे संपूर्ण वर्धेकरांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे.

सकाळपासूनच सूर्यदेव आग आेकत असल्याने दुपारी १२ नंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळले आहे. बुधवारी (ता. २०) शहरातील प्रमुख व अन्य मार्गांवर  कमालीचा शुकशुकाट पहायला पाहायला मिळाला. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठांमध्येही शुकशुकाट पसरला असून, नागरिक फक्त अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडत आहेत. थंड पेये, कलिंगड आणि रसवंती गृहांवर मात्र नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. बाहेर पडताना डोक्याला रुमाल, टाेपी किंवा छत्रीचा वापर करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेऊ नये म्हणून भरपूर पाणी, लिंबू पाणी किंवा ताक प्यावे. चक्कर येणे, उलट्या हाेणे किंवा जास्त त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘उष्ण रात्री’चा इशारा

हवामान खात्याने वर्धा आणि परिसरासाठी पुढील २४ तासांचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. या काळात भागात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, रात्रीच्या तापमानातही वाढ होऊन नागरिकांना ‘उष्ण रात्र’ अनुभवावी लागणार आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून सुटका मिळणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.