Amravati Crime : पतीच्या ओळखीतील व्यक्तीकडून बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर वारंवार अत्याचार; गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल
esakal May 21, 2026 03:45 AM

अमरावती : बंदुकीचा धाक दाखवून पतीसह मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पतीच्या ओळखीतील व्यक्तीने अनेक दिवसांपासून विवाहितेवर अत्याचार केला. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरुद्ध अत्याचार, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

विपुल भानुदास ठाकरे (वय ४३), असे अत्याचार व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली. संशयित व्यक्ती पीडित महिलेच्या पतीच्या ओळखीतील आहे. घरी येणे-जाणे वाढल्यामुळे संशयित विपुल याने पीडितेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने संशयित विपुल ठाकरे यास नकार दिला. मात्र, पीडितेचा पती बाहेरगावी गेल्याचे बघून त्याने पीडितेला सांगितले की, माझी पत्नी बाहेरगावी गेली असून जेवणाचा डबा करून घरी ये. जेवणाचा डबा दिल्यानंतर संशयित विपुलने पीडितेचा हात पकडून तिला बंदुकीचा धाक दाखविला.

नवऱ्याला व मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर जेव्हा जेव्हा पीडितेचा पती बाहेरगावी जायचा तेव्हा, तेव्हा संशयित विपुल ठाकरे हा पीडितेच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. शारीरिक संबंधाचे व्हिडिओसुद्धा संशयिताने काढून ठेवले होते. त्यानंतर घटनेची वाच्यता केल्यास तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली, असा आरोप पीडित विवाहितेने गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अद्याप संशयितास अटक करण्यात आली नाही.

पीडितेच्या तक्रारीवरून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. २०२३ पासूनचा हा कालावधी असून, त्याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

-गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.