Amravati Accident: पंचवटी उड्डाणपुलावर भीषण अपघात; नवीन बुलेटसह दोन युवक ३० फूट खाली
esakal May 21, 2026 03:45 AM

अमरावती : पंचवटी उड्डाणपुलावरून दोन बुलेटस्वार सुरक्षारस्ता दुभाजकावर धडकल्यानंतर पंचवीस ते तीस फूट उंचावरून खाली कोसळले. अपघातात दोघेही जखमी असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

बुधवारी (ता. २०) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. अक्षय भागवत धाकडे (वय २९, रा. आदर्शनगर, बडनेरा) व कार्तिक प्रदीप छापानी (वय २४, रा. निंभोरा), असे जखमींची नावे असून, त्यापैकी अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. दोघांनाही नागरिकांनी उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल केल्यावर प्रकृती गंभीर असल्याने शहरातील खासगी रुग्णालयात हलविले.

जखमींपैकी एकाच्या भावाने नवीनच बुलेट विकत घेतली होती. आरटीओकडून त्या बुलेटला क्रमांक सुद्धा मिळायचा होता. अक्षय व कार्तिक हे दोघे नवीन बुलेटने फिरण्यासाठी म्हणून गाडगेनगरकडून शिवाजी संस्थेकडे निघाले होते. हा मार्ग एकमार्गी वाहतुकीचा आहे. उड्डाणपुलावर वळणावर असताना वेगावर नियंत्रण नसल्यामुळे दुचाकी आधी रस्ता दुभाजकावर जोरदार धडकली. त्यानंतर दोघेही उड्डाणपुलावरून पंचवटी चौकात पंचवीस ते तीस फूट खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. दुचाकी ही उड्डाणपुलावरच पडून होती. घटनास्थळी वाहतूक पोलिस विभागाने धाव घेतली. वृत्त लिहीस्तोवर गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.