उल्हासनगर हादरलं!  जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा भर दिवसा गोळीबार, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम May 22, 2026 01:13 AM

Ulhasnaga Crime News : उल्हासनगर येथील कैलास नगर परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गोळीबारात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या गॅंगने गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. 
उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण अशा दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

कैलास कॉलनी चौकात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगर मधील कैलास कॉलनी चौक परिसरात जुन्या वादातून भररस्त्यात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. 10 ते 12 जणांच्या टोळीने बाईकवर येत अंदाधुंद गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

उल्हासनगरातील प्राचीन शिवमंदिर रोड परिसर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. कैलास कॉलनी चौकातील के.सी ग्रुप कार्यालयाजवळ आज संध्याकाळी एका टोळीने अचानक गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात तब्बल सात राउंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात अमोल चव्हाण, अनिल चव्हाण आणि अर्जुन चव्हाण हे तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अर्जुन चव्हाण याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिसर सील केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.