ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी
esakal May 22, 2026 02:45 AM

पुणे : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी जवळपास एक हजार ५६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ९८२ विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गुरूवारपासून सुरू झाली आहे. राज्यातील सर्व ‘आयटीआय’मध्ये मिळून एकूण ८४ ट्रेंड आहेत. राज्यातील ४१८ शासकीय आयटीआयमधील एकूण ९७ हजार ८८ जागा आणि ५८६ खासगी आयटीआयच्या एकूण ६० हजार ५७६ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये गुरूवारपासून सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.

विभागनिहाय ‘आयटीआय’ची संख्या आणि प्रवेशाच्या उपलब्ध जागा :

विभाग : ‘आयटीआय’ची संख्या : प्रवेशासाठी उपलब्ध जागा

अमरावती : ९८ : २१,२२८

छत्रपती संभाजीनगर : १५० : २४,३६०

मुंबई : १०६ : २०,७०४

नागपूर : २३६ : २९,१७६

नाशिक : २१९ : ३०,६६८

पुणे : १९५ : ३१,५२८

एकूण : १,००४ : १,५७,६६४

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.