ढग आले दाटून, पाऊस आला धावून! तापमानात वाढ होत असताना राज्यात पावसाची हजेरी, उकाड्यापासून दिलासा
एबीपी माझा ब्युरो May 22, 2026 10:13 PM

Maharashtra Rain News : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या काही भागात पावासाने हजेरी लावली आहे. यामुळं नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोब मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं हजेरी लावल्यामुळं तापमानाचा पारा काही प्रमाणात कमी झाला आहे. 

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा, पावसामुळं रस्त्यावर पाणीच पाणी

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ज्योती चौकात पावसानंतर रस्त्यावर पाणी भरलं आहे. नागरिकांना वाहने चालवताना त्रास होत आहे. या पावसामुळं वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. काही दिवसांपासून पुणे शहरात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज सकाळपासून मात्र शहरात ढगाळ वातावरणामुळे दुपारी पावसाला सुरुवात झाली. शहरातील उपनगर तसेच मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पुणे शहरात पावसाची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे निश्चित काही पुणेकरांची तारांबळ उडाली असली तरी सुद्धा उकाडापासून पुणेकरांना नक्कीच या पावसाने दिलासा दिला आहे. 

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

मुंबईकर आतुरतेने मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत होते. आज सकाळी मान्सूनपूर्व पावासाला सुरूवात झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. हलक्या सरी का होईना, पण या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये दुपारीचं अंधार, धो-धो पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवडमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंधारमय वातावरण झालं आहे. तुफान पाऊसही सुरु झाला आहे. उकाड्याने हैराण झालेले शहरवासीय पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. गेल्या दोन दिवसांपासून भर दुपारी ढग दाटून येत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. आज मात्र ढग इतके दाटून आले की अंधारमय वातावरण ही झालं आणि तुफान पाऊस ही कोसळला. यामुळं शहरवासीयांना ताटकळत उभं रहावं लागलं. 

रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी

रायगडमध्ये अखेर अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. रायगड मधील दक्षिण भागात माणगाव, महाड म्हसळा श्रीवर्धन परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरला आहे. प्रवाशी आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दक्षिण रायगड नंतर आता उत्तर भागातील खालापूर, खोपोली, कर्जत परिसरात देखील पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. खोपोली परिसरातील बोरघाट, मुंबई पुणे जुना हायवे, एक्सप्रेस वे सह ग्रामीण भागात देखील पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खंडाळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत कण्हेरी परिसराला अक्षरशः झोडपून काढलं. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहू लागले...दरम्यान, अतिट गावात वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाला असून शेतकरी रामदास जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे... तर कण्हेरी परिसरातील वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटा भिजल्याने सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे... खंडाळा तालुक्यातील असवली, कण्हेरी, लोहोम, कर्नवडी, घाडगेवाडी, अतिट, कवठे आणि जवळे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी अचानक आलेल्या या  पावसामुळे शेतकरी आणि वीटभट्टी चालक अडचणीत आले आहेत..

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. विजांच्या कडकडाटसह चिपळूणमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेल्या नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. चिपळूणसह खेड गुहागर मध्येही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.