...पैशांची कमतरता असेल लाडकी बहीण योजना बंद करा, शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
अभिषेक मुठाळ May 23, 2026 01:43 AM

मुंबई: महायुती सरकारसाठी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला. मराठा समाजाच्या महामंडळाला 150 कोटी दिल्याचं उदय सामंत का बोलले ते माहिती नाही. आमचं म्हणणं हे आहे 150 कोटी मराठा समाजाच्या महामंडळाला दिले, असं वाटतंय, अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमातीच्या महामंडळांना कमीत कमी 15-15  हजार कोटी रुपये देणे गरजेचे आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं. 

पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा

गुणरत्न सदावर्ते पुढं म्हणाले की, महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा ब्राह्मणांच्याकरिता जी महामंडळं असतील, त्या महामंडळांना 150 कोटी नाही 15 हजार कोटींची तरतूद करुन पैशाचं वाटप होणं आवश्यक आहे. उदय सामंत तुम्हाला सांगायचं आहे, केवळ 150 कोटी नाही, आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याच बरोबर खऱ्या कष्टकरी शेतमजुरांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज मी आपल्या माध्यमातून म्हणत आहे, घाम गाळणाऱ्यांना कष्टकऱ्यांना, त्यांच्या विहिरींचे पैसे मागील चार वर्षांपासून थांबलेत ते दिले पाहिजेत, कांद्याला 2 हजार रुपये भाव झाला पाहिजे.पावसाळ्याच्या अगोदर एकरी 10 हजार रुपये सरकारच्या ॲडव्हान्स दिले गेले पाहिजेत. हे आवश्यक आहे, हे करत असताना पैशांची कमतरता असेल तर राजकीय कारणात्सव लाडकी बहीण योजनेखाली आपण जे पैसे देतो, नाही तरी आपण पैसे देऊन वेगवेगळ्या चौकश्या लावत आहात. तेव्हा ती योजना बंद करा पण शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या. शेतकऱ्यांना भरभरुन पैसे द्या, कारण ते घामाचा थेंब थेंब गाळतात, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.

लाडकी बहीण योजना एकदाची आता बंद करा, कारण लाडकी लाडकी लाडकी आम्ही बहिणींच्या विरोधात नाहीत, परंतु बहिणींना   शिक्षणासाठी पैसे द्या, शिष्यवृत्ती वाढवा, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवा. सरकारच्या योजना आहेत ज्यात रोजंदारीसाठी खेड्यातील महिला जातात, त्यांच्या रोजंदारीचा दर वाढवा. स्वत:च्या शेतामध्ये अल्पभूधारक शेतकरी भगिनी काम करत असतील तर मनरेगा सारख्या योजनेत त्यांना वाढ द्या.

प्रसाद लाड यांनी जरांगेंचा लाड केला, मात्र जरांगेचा विचार मात्र विळ्यासारखा वाकडा राहिला, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.  मनोज जरागेंच्या मागण्या संविधानाशी संंबंधित नाहीत.

लाडकी बहीण खरंच बहीण आहे, परंतु त्या बहिणीच्या कष्टासोबत, तिच्या रोजगारात, शासनाच्या योजनांमध्ये रोजंदारीत वाढीव पगार चालू करावा. शेतकऱ्यांना पैशाचं वाटप करावं. सुप्रीम कोर्टानं अशा योजनांबाबत टिप्पणी केली आहे. बहिणींना पुढं नेण्याचा मार्ग नसून याबाबत कोणी राजकारण करु नये ही प्रांजळ भूमिका आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.