पुणे : नीट पेपरफुटीप्रकरणाचे (NEET Paper) पुणे कनेक्शन अधिक गडद झाले असून नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आता पुण्यातील आणखी एका महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रश्न पुरविण्याचा बदल्यात मनीषा हवालदारने रोख रक्कम स्वीकारल्याचे सीबीआय (CBI) तपासात उघड झालं आहे. मनीषा हवालदारने नीट संबंधित प्रश्नांच्या हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्या होत्या. संबंधित प्रश्न व्हॉट्सअँप आणि प्रिंटआउट काढून दिले, त्याबदल्यात रोख रक्कम स्वीकारल्याची माहिती आहे. याप्रकरणी, मनिषा हवालदारला 25 तारखेला सीबीआयकडून दिल्ली न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
सीबीआयने मनीषा हवालदारला पुण्याच्या विशेष न्यायालयात रात्री 12 वाजता हजर केलं आणि ट्रान्झिट रिमांड घेतली. एनटीएकडून मनीषा हवालदार नीट परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अधिकृत अनुवादक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, आर्थिक मोबदल्यासाठी मनिषा मांढरेशी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना त्यांनी प्रश्न पुरवले, अशी सूत्रांची माहिती आहे.
भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या "नोट्स" आरोपी हवालदार यांनी जाळून नष्ट केल्याची धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा हाती काही लागू नये म्हणून ह्या नोट्स जाळून टाकण्यात आल्या आहेत. हवालदारने मनीषा मांढरेसोबत केलेले चॅटिंग सुद्धा डिलिट करण्यात आले. मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरेमध्ये व्हॉट्सॲप चॅट झाले होते, त्याचे मेसेज डिलिट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा मनिषा मांढरेला प्रश्नमालिका पाठवल्याची धक्कादायक माहिती सीबीआय तपासातून पुढे आली आहे.
नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता.