वडिल डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला 'बॉस'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 25, 2026 09:13 AM

Actor Girish Karnad Life Story: सिनेसृष्टीत (Film Industry) अनेकजण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, इंडस्ट्रीत मोठं नाव कमावणं, पैसा कमावणं आणि सुपरस्टार होणं कित्येकांचं स्वप्न असतं. पण, त्यापैकी काही जण फक्त हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच किंवा अभिनयासाठी येत नाहीत, तर ते आपल्या मागे एक समृद्ध वारसाच सोडून जातात. ही कथा अशाच एका कलाकाराची. एका अशा माणसाची, ज्याचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या पटकथेपेक्षा कमी नाट्यमय नव्हतं. त्याचे वडील डॉक्टर होते आणि आई नर्स... त्यामुळे यांचा मुलगाही आपलं शिक्षण पूर्ण करुन एखागी उच्च पदस्थ नोकरी मिळवेल, असंच सर्वांना वाटत होतं. तो अभ्यासात अत्यंत हुशार होता, त्याला वाचनाची प्रचंड आवड होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याला कविता लिहायला खूप आवडायचं. मग आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं आणि कवी होण्याचं स्वप्न पाहणारा तो तरुण पुढे जाऊन नाटक आणि सिनेमा क्षेत्रांतला एक उत्तुंग व्यक्तिमत्व बनला. मग, पुढे याच व्यक्तीनं सलमान खान स्टारर 'टायगर' फ्रँचायझीमध्ये दबंग भाईजानच्या बॉसची भूमिका साकारलेली आणि तो नव्या पिढीचाही लाडका कलाकार बनला. आम्ही ज्या कवी मनाच्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो अभिनेता म्हणजे, गिरीश कर्नाड (Actor Girish Karnad). 

भारतीय रंगभूमी, साहित्य आणि सिनेसृष्टीवर अमिट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये गिरीश कर्नाड यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथानकाप्रमाणे प्रेरणादायी आणि बहुआयामी होतं. डॉक्टर वडील आणि नर्स आई यांच्या घरात जन्मलेल्या गिरीश कर्नाड यांच्याकडूनही उच्च शिक्षण घेऊन मोठं करिअर घडवण्याची अपेक्षा होती. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या कर्नाड यांना वाचन, लेखन आणि विशेषतः कविता लिहिण्याची प्रचंड आवड होती. मात्र, नियतीनं त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला आणि साहित्याची ओढ त्यांना पुढे रंगभूमी आणि सिनेसृष्टीकडे घेऊन गेली.

19 मे 1938 रोजी जन्मलेल्या गिरीश कर्नाड यांचं बालपण शैक्षणिक वातावरणात गेलं. पुस्तकांच्या सहवासामुळे त्यांच्यात विचारशीलता आणि सर्जनशीलता विकसित झाली. पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रतिष्ठेची 'रोड्स स्कॉलरशिप' मिळाली आणि ते इंग्लंडमधील University of Oxford इथे दाखल झाले. तिथे त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. मात्र, अभ्यासक्रमाबरोबरच साहित्य, कविता आणि कथांच्या विश्वात रमणं त्यांना अधिक आवडायचं. ऑक्सफर्डमधील हा काळ त्यांच्या विचारविश्वाला नवी दिशा देणारा ठरला आणि याच काळात त्यांच्या साहित्यिक आणि कलात्मक प्रवासाची पायाभरणी झाली.

कवी बनण्यासाठी निघालेले, मग बनले सुपरस्टार (Actor Girish Karnad Story)

ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेत असताना गिरीश कर्नाड यांचं स्वप्न होतं की, त्यांनी एक मोठं कवी बनावं. पण, त्याचवेळी त्यांना याची जाणीव झाली की, भारतीय कहाण्यांमध्ये एवढी क्षमता आहे की, त्या संपूर्ण जगापर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात. मग इथूनच त्यांचं आयु्ष्य पूर्णपणे बदलून गेलं. त्यांनी नाटक लिहिणं सुरू केलं आणि 1961 मध्ये लिहिलं गेलं त्यांचं पहिलं नाटक 'ययाति'. हे नाटक एवढं गाजलं की, त्यावेळी सुपरडुपर हिट ठरलं. त्यानंतर 'तुगलक', 'हयवदन' आणि 'नागमंडल' यांसारख्या नाटकांमार्फत त्यांनी मोठं नाव कमावलं. 

थिएटर्सपासून फिल्म्सपर्यंत सगळीकडे हिट ठरले गिरीश कर्नाड (Girish Karnad Films)

लिखाणानंतर गिरीश कर्नाड यांनी अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं आणि इथेही लोकांना आपलंस केलं. 'मंथन', 'निशांत', 'डोर', 'इकबाल' आणि 'मालगुडी डेज' यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांचं नाव आजही लक्षात ठेवलं जातं. स्क्रीनवर त्यांचा शांत अंदाज आणि दमदार डायलॉग्ज डिलीवरी सर्वांना आपलंस करते. 

सलमान खानचा बॉस बनून जिंकली प्रेक्षकांची मनं (Girish Karnad In Tiger Film)

आजच्या नवीन पिढीसाठी, गिरीश कर्नाड यांच्या सर्वात अविस्मरणीय सिनेमांमध्ये 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांचा समावेश होतो. या सिनेमांमध्ये त्यांनी 'RAW'च्या प्रमुखाची भूमिका साकारली होती. त्यांचं पात्र अत्यंत प्रभावशाली व्यक्ती म्हणून, म्हणजेच सलमान खानचे बॉस म्हणून, चित्रित करण्यात आलं होतं. पडद्यावर त्यांना काम करण्यासाठी मर्यादित वेळ मिळाला असला, तरीही प्रत्येक दृश्यात त्यांनी आपली एक वेगळीच छाप उमटवली. 10 जून 2019 रोजी गिरीश कर्नाड यांनी या जगाचा निरोप घेतला. तरीही, त्यांचे सिनेमे, नाटकं आणि त्यांतील पात्र आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत.

Bollywood Actors Struggle Life: कधीकाळी शिवणकाम करायचा 'हा' अभिनेता; रिटायरमेंटच्या वयात संधी मिळाली, पन्नाशीत दिले 250 हून अधिक सुपरहिट सिनेमे

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.