Deool Band 2 Box Office Collection: प्रवीण तरडे लिखित व दिग्दर्शित 'देऊळ बंद 2 ' (Deool Band 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. त्याचं कारणही तसंच होतं. 2015 ला प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद ' या चित्रपटानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा स्वामी प्रेक्षकांसमोर आले आहेत. (Deool Band 2 Box Office Collection) पहिल्या भागाला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता होती. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शनिवार रविवारी चांगली कमाई केली असून चौथ्या दिवशी 5.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला अवघ्या चार दिवसातच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. भारतभरातून या चित्रपटाने 18.59 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.
प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित देऊळ बंद 2 चित्रपटाने प्रदर्शनाची चौथ्या दिवशी 5.90 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं. शनिवारी 4.85 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली होती. देशभरातील या चित्रपटाचे नेट कलेक्शन 15.75 कोटी रुपये झाले आहे. ग्रॉस कलेक्शन 18.59 कोटी नोंदवण्यात आले.शनिवारपेक्षा 21.6% ची वाढ या चित्रपटाच्या कमाईत रविवारी दिसली. रविवारी संध्याकाळच्या शोजला प्रेक्षकांनी सर्वाधिक गर्दी केली होती. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 चित्रपटाचा विकेंड दमदार गेला.
पहिल्या दिवशी -2.45 कोटी
दुसरा दिवस -2.55 कोटी
तिसरा दिवस -4.85 कोटी
चौथा दिवस -5.90 कोटी
महाराष्ट्रभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. मुंबईत या चित्रपटाचे सर्वाधिक शो लागले असून पुणे ,नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हा चित्रपट प्रेक्षक अधिक पाहत आहेत. रविवारी मुंबईमध्ये या चित्रपटाचे 540 शो लागले होते. जवळपास 71.8% प्रेक्षक संख्येसह हा चित्रपट पाहिला गेला. पुण्यात 366 शोजमध्ये 79.8% प्रेक्षक संख्येने हा चित्रपट पाहिला गेला.
प्रवीण तरडे दिग्दर्शित व लिखित देऊळ बंद 2 चित्रपटात मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची मुख्य भूमिका साकारली आहे. प्रसाद ओक मंगेश देसाई स्नेहल तरडे ओम भूतकर महेश मांजरेकर हे कलाकार ही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. पहिला भागात राघव शास्त्रीची भूमिका करणाऱ्या गश्मीर महाजनी सुद्धा दुसऱ्या भागामध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना देऊळ बंद पाहताना दिग्दर्शकाने सुखद धक्का दिला असून , या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची घोषणाही करण्यात आली आहे.