आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क May 26, 2026 07:13 PM

Mahesh Pawar Death in Ambenali Ghat Accident: रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) भीषण घटना घडली.  स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं.  वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं स्कॉर्पिओ एक हजार फूट दरीत कोसळली.  या अपघातात एकूण आठ तरुणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या भीषण अपघातात 25 वर्षीय मराठी अभिनेत्याचाही (Mahesh Pawar Accident News) मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.  या अभिनेत्यानं 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत काम केलं होतं.  या घटनेनंतर सिनेसृष्टीतही खळबळ उडाली.

आंबेनळी घाटात मराठी अभिनेत्याचा मृत्यू (Appi Amchi Collector actor dies in Scorpio crash)

महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटातील अपघातामुळे  महाराष्ट्र सुन्न झाला. स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळली आणि 8 तरुणांना जीव गमवावा लागला.  या अपघातात मराठी अभिनेत्यालाही आपला जीव गमवावा लागला. महेश पवार (वय वर्ष 25) असे मराठी अभिनेत्याचे नाव असून, त्यानं आपल्या कारकि‍र्दीत 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.   मिळालेल्या माहितीनुसार,  महेश हा साताऱ्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  ᴍᴀʜᴇꜱʜ ᴩᴀᴡᴀʀ ( ᴍᴀxx ) 🤴🏻 (@mahesh_pawar_2427)

मराठी अभिनेता महेश पवार याचे निधन, रोहित परशुरामची भावनिक पोस्ट (Rohit Parshuram emotional post for Mahesh Pawar)

माहितीनुसार, शुक्रवारी त्याचा वाढदिवस होता. बर्थ डे असल्याकारणाने तो फिरायला गेला होता.   शनिवारी कोकणहून साताऱ्याच्या दिशेनं परतत असताना आंबनेळी घाटात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.  यात महेशसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर महाराष्ट्राला हादरा बसला.  'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील मुख्य कलाकार रोहित परशुराम यानं महेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे.  त्यानं हा फोटो इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट केला आहे. 

'मह्या,.. काल तुला हॅपी बर्थ डेचा मेसेज केला. त्याचा तू रिप्लाय केला नाहीस. आज तुझ्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट करायला लागली आहे. मह्या हे चुकीचं आहे.  अरे,,.. तुझ्या घरी जेवायला यायचं राहिलंच...', असं रोहित परशुरामने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या अभिनेता रोहितची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

या भीषण अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. नितीन किसन नायकोंडे (वय वर्ष 35), उत्कर्ष  आनंद शिंगटे (वय वर्ष 21), अनिल  अभिमन्यू शिंगटे (वय वर्ष 25), रितेश राजेंद्र लोखंडे (वय वर्ष 25), आदित्य अशोक साळुंखे (वय वर्ष 21), सुहास जितेंद्र लोखंडे (वय वर्ष 20), अंश समीर चव्हाण (वय वर्ष 18) असे मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  अपघातानंतर तरुणांचे मोबाइल बंद झाले होते.  कुटुंबाने तरुणांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु लागला नाही. यानंतर कुटुंबाने पोलिसांना याची माहिती दिली.  यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सनी देओलच्या बायकोला पाहिलंत का? मॉडर्न अंदाज पाहून डोळे फिरतील, सुंदर इतकी की....

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.