Heat Stress : उन्हाळ्यात लहानसहान गोष्टींवर चिडचिड का होते? जाणून घ्या नेमकं कारण
Marathi May 27, 2026 09:25 AM

सकाळी घराबाहेर पडताच अंगावर येणारी गरम हवा, ट्रॅफिकमध्ये अडकलेली वाहनांची रांग, सतत वाहणारा घाम आणि वाढत जाणारी अस्वस्थता… उन्हाळ्यात अनेक लोकांना नकळत चिडचिड, राग आणि मानसिक थकवा जाणवू लागतो. काहीजण अगदी छोट्या गोष्टींवरही पटकन संतापतात, तर काहींचा मूड सतत खराब राहतो.

अनेकांना वाटतं की हा फक्त स्वभावाचा भाग आहे. पण तज्ज्ञांच्या मते, यामागे उन्हाळ्याचा आणि वाढत्या तापमानाचा थेट संबंध असू शकतो. शरीरासोबतच गरमीचा परिणाम आपल्या मेंदूवर आणि भावनांवरही होतो. जाणून घेऊया उन्हाळ्यात जास्त राग आणि चिडचिड का होते आणि अशावेळी स्वतःला शांत कसं ठेवायचं…

उन्हाळ्यात मन जास्त अस्वस्थ का होतं?
तज्ज्ञांच्या मते, अत्यंत उष्ण वातावरणामुळे शरीरावर ताण वाढतो. यालाच काही प्रमाणात सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरशी जोडून पाहिलं जातं. यावेळी व्यक्तीला सतत चिडचिड होणे, पटकन राग येणे, मूड स्विंग्स होणे, लक्ष केंद्रित न होणे, थकवा आणि बेचैनी जाणवणे अशा समस्या जाणवू शकतात.

1) शरीरात पाण्याची कमतरता वाढते
उन्हाळ्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. डिहायड्रेशन झाल्यावर मेंदूवर ताण येतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. चिडचिड वाढते आणि संयम कमी होतो म्हणूनच गरमीमध्ये पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं ठरतं.

2) अपुरी झोप
उन्हाळ्यात रात्री उकाडा असल्यामुळे शांत झोप लागत नाही. अनेकदा मध्येच जाग येते किंवा झोप पूर्ण होत नाही. झोप अपुरी राहिल्यास दिवसभर मूड खराब राहतो. छोट्या गोष्टींचाही त्रास होतो मानसिक थकवा वाढतो यामुळे व्यक्ती अधिक चिडचिडी बनते.

3) तणाव वाढवणारा हार्मोन होतो सक्रिय
उन्हाळ्यात शरीरात कोर्टिसल या तणाव वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढू शकते. यामुळे राग पटकन येतो. ट्रॅफिकमध्ये संयम सुटतो. लोकांशी वाद होण्याची शक्यता वाढते आणि मानसिक ताणसुद्धा वाढतो. म्हणूनच उन्हाळ्यात रोड रेज आणि भांडणांच्या घटना वाढल्याचं अनेक संशोधनांमध्ये दिसून येतं.

4) गरमीचा शरीरावरही परिणाम
उन्हाळ्यात फक्त मनच नाही तर शरीरही त्रस्त होतं. सामान्य समस्या म्हणजे डोकेदुखी, मायग्रेन, हृदयाचे ठोके वाढणे, थकवा, अशक्तपणा या गोष्टींचा परिणाम थेट मूडवर होतो.

स्वतःला शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय

राग किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास सर्वप्रथम थंड पाणी प्या. यामुळे शरीर आणि मेंदूला आराम मिळतो.

तणाव वाढल्यावर काही मिनिटं शांत बसून खोल श्वास घ्या.

वाहतुकीत अडकल्यावर राग वाढण्याऐवजी शांत संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा.

दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणं टाळा. शक्य असल्यास थंड आणि हवेशीर ठिकाणी राहा.

जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात. त्याऐवजी हलकं आणि पौष्टिक अन्न खा.

सकाळी किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालणं, झाडांमध्ये बसणं किंवा ध्यान करणं मनाला शांत ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.