सिद्धिविनायक मंदिराच्या कॉरिडोअर प्रकल्पाचा वाद चिघळला, मैदानासाठी नागरिक रस्त्यावर
Tv9 Marathi May 27, 2026 04:45 PM

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नर्दुल्ला टँक मैदानावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. या मैदानावर प्रस्तावित असलेल्या पार्किंगच्या जागेला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट या प्रश्नावर चांगलाच आक्रमक झाला आहे. मैदान वाचवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराशेजारील मैदान परिसरात एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिकांचा आणि ठाकरे गटाचा विरोध का?

प्रभादेवी परिसरातील नर्दुल्ला टँक मैदान हे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे मैदान लहान मुलांसाठी हक्काचे खेळाचे ठिकाण आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळ-संध्याकाळ फिरण्याची हक्काची जागा आहे. याशिवाय, वर्षभर अनेक सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रम याच मैदानावर आयोजित केले जातात. मात्र, सिद्धिविनायक कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत या मैदानावर पार्किंग प्रस्तावित केल्याने नागरिकांच्या हक्काची मोकळी जागा हिरावून घेतली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोर्चाची हाक आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग

या प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि मैदान सुरक्षित ठेवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात स्थानिक आमदार महेश सावंत आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आपले हक्काचे मैदान वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या हक्काच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

महेश सावंत यांनी दिली प्रतिक्रिया

आमचा विरोध हा सिद्धिविनायक कॉरिडोरला नाहीये. आमचा विरोध मैदान घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला आहे. मात्र, शिवसेना असताना त्यांचा हा प्रयत्न कधी यशस्वी होणार नाही असे महेश सावंत यांनी म्हटले होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.