पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता; काँग्रेसचं पत्र
वेदांत नेब May 27, 2026 05:13 PM

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण (SIR) मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान सुरु होणार आहे. या कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातील लाखो वारकरी वारीत सहभागी होत असल्याने ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची भीती आहे, याचा विचार करुन पंढरपूर वारी (Pandharichi wari) आणि अतिवृष्टीच्या कालावधीत एसआयआर कार्यक्रम आयोजित करू नये, तो महिनाभर पुढे ढकलावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan sapkal) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यात मान्सूनचे लवकरच आगमन होणार असून पुढील तीन महिने पाऊस काळ असणार आहे. तसेच, जुलै महिन्यात आषाढी एकादशीही होत असून पुढील महिन्यात त्यासाठी पंढरीच्या वारीची तयारी राज्यातील लाखो वारकरी करणार आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींसह इतरही काही प्रमुख पालख्यांचे प्रस्थान वारकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. दुसरीकडे मतदार यादी पुनरिक्षण म्हणजे एसआयआरचा दुसरा टप्पाही 19 जून 2026 पासून सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अडचणी लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे पुनरिक्षण पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पाठवलेल्या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी मतदार यादी पुनरिक्षण SIR कार्यक्रम घोषित केला असून महाराष्ट्रात मॅपिंगचे काम अंदाजे 72 टक्क्यापर्यंत झाले असल्याचे आयोगाने दिलेल्या माहितीवरून समजते. 19 जून 2026 पर्यंत हे काम सुरु राहणार असून दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविला जाणार असल्याचे समजते, यासाठी बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र वाटप करून मतदारांकडून भरून घेतले जाणार आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून या कालावधीत आषाढी वारी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जवळपास 20 हून अधिक जिल्ह्यातील वारकरी या कालावधीत पंढरपूरला वेगवेगळ्या दिंड्यांमधून पायी जात असतात, ते घरी नसल्याने त्यांची नावे वगळली जाऊ शकतात. तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टी होईल व जनजीवन विस्कळीत होईल. या सर्वांचा विचार करून एसआरए कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असे म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, एसआयआर मोहीम वैध असल्याचा निर्वाळा, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.