मुंबई : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीनेही आता या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व म्हणजे 17 जागा लढवणार आहे. त्यामध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी जागा लढवणार आहे. येत्या 18 जून रोजी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
या 17 जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागा लढणार आहे. तर ठाकरेंची शिवसेना पाच ते सहा जागा लढणार आहे. त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादी तीन ते चार जागावर लढणार असल्याची माहिती आहे.कोण कुठल्या जागांवर लढणार याविषयीचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत घेतला जाणार असल्याची माहिती आहे. 26 तारखेला मविआ नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून त्यावेळी अंतिम चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान, महायुतीतल्या नाराजीचा फायदा उठविण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे तो ती लढवेल अशी माहिती आहे. त्यानुसार चंद्रपूर, सांगली–सातारा या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. तर परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्यानुसार जागावाटप होणार असल्याची माहिती आहे.
2022 मध्ये भाजपसोबत एकत्र येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं.. पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीही या सरकारमध्ये सामील झाली. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत या महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं. मात्र, निवडणूक कोणतीही असो या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्कं झालं.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीतील जागावाटपावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या जागावाटपाचा तिढा ही आता दिल्ली दरबारी गेला आहे. विधान परिषदेच्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्रीही दिल्लीत दाखल होणार आहेत. महायुतीचे तिन्ही नेते अमित शाहांना भेटून जागावाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळतंय.
अधिसूचना जारी: 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
अर्जाची छाननी : 2 जून
अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
मतमोजणी : 22 जून
ही बातमी वाचा:
आणखी वाचा