बंगाली सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकात्याच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे गरियाहाट येथे राहत होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा जीव वाचू शकला नाही. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिक दत्ता हे अत्यंत सर्जनशील दिग्दर्शक होते. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर लाल बाजार पोलीस मुख्यालयाचे होमिसाईड डिपार्टमेंट तात्काळ घटनास्थळी आलं आणि चौकशीची चक्रे वेगाने फिरली. या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. अनिक दत्ता बंगाली सिनेमाचं मोठं नाव होतं. गेल्या 14 वर्षापासून ते बंगाली सिनेजगतावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अत्यंत कमी सिनेमे दिग्दर्शित केले. पण त्यांच्या सर्व सिनेमांचं प्रचंड कौतुक झालं. आज त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणं शक्य नाही. त्यामुळे उद्या 28 मे रोजी शवविच्छेदन झाल्यावरच त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.
हॉरर कॉमेडी सिनेमाने सुरुवातअनिक दत्ता यांनी 2012मध्ये Bhooter Bhabishyat या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा होता. या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी केवळ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं नव्हतं, तर सिनेमाची कथा आणि पटकथाही त्यांनीच लिहिली होती. त्यानंतर त्यांनी Astonishing Lamp, मेघनाद बध रहस्य, भोबिश्योतेर भूत, बोरुनबाबुर बंधु, Aparajito, Joto kando kolkatatei आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं.
राष्ट्रीय पुरस्कारत्यांनी Astonishing Lamp या सिनेमाचं दिग्दर्शन केलंच. पण त्यांनी या सिनेमात गीतकार म्हणूनही कामगिरी पार पाडली. Aparajito सिनेमाचं दिग्दर्शन करतानाच गीतकार आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही त्यांनी बाजू सांभाळली होती. या सिनेमाला 2022मध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टवर ते सध्या काम करत होते. मात्र, त्यांनी अचानक एक्झिट घेतल्याने त्यांचं हे काम आता अधुरं राहिलं आहे. अनिक दत्ता यांच्या निधानाने फिल्म जगतावर शोककळा पसरली आहे. अनिक दत्ता यांचा मृत्यू तोल गेल्याने झाला की यामागे काही घातपात आहे का? याचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.