Pune Accident News : पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पुन्हा एकदा "ड्रिंक अँड ड्राईव्ह" चा थरार घडला आहे. एका 19 वर्षीय तरुणाने बेदरकारपणे वाहन चालवत अपघात केला आहे. वेगात असल्याने गाडी गरवारे पुलावरुन खाली कोसळली. दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने पुलावरील रेलिंग देखील तोडले आहे. या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व अमित जैन (19) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनसार, ही घटना 25 मे रोजी रात्री 1.30 वाजता पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली. संबंधित आरोपी तरुण हा जंगली महाराज रस्त्याचे डेक्कन जिमखाना येथून जात होता. रात्रीची वेळ असल्याने आरोपी त्याचे वाहन (क्रमांक एम एच 31 एफ आर 5863) जंगली महाराज रस्त्याने जात असताना बेदरकारपणे चालवत होता. डेक्कन जिमखाना जवळ असलेल्या गरवारे पुलावरून गुडलक चौकाकडे जात असताना चालक दारूच्या नशेत असल्याने वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही आणि त्याने त्याचे वाहन या पुलावर असलेल्या रेलिंग वर धडकावले. गाडीचा वेग जास्त असल्याने वाहन पुलावरील रेलिंग तोडून पलीकडच्या बाजूला जाऊन कोसळली.
अपघात होताच रात्रीची वेळ जरी असली तरी रहदारीचा भाग असल्यामुळे स्थानिकांची आणि इतर वाहन चालकांची सुद्धा मोठी गर्दी झाली. सुदैवाने या घटनेत चालक वगळता कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.