संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
स्वानंद पाटील May 28, 2026 02:43 AM

Beed Kej Crime Case : महाराष्ट्रात एकीकडे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा आणि हक्कांचा मोठा गाजावाजा केला जात असताना, बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) येथे सरकारी यंत्रणेची कमालीची संवेदनशून्यता आणि अमानुषपणा समोर आला आहे. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात (Kej Sub District Hospital) एका अल्पवयीन पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी (Medical Examination) तब्बल 10 तास ताटकळत ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एकीकडे अत्याचाराच्या भीषण धक्क्यात असलेल्या या निष्पाप मुलीला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभर रुग्णालयात काढावा लागला, तर दुसरीकडे गुन्हा दाखल करण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यात जागून काढावी लागली. या संतापजनक प्रकारामुळे बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Beed Crime Case : चुलत मामे-भावाचे अमानुष कृत्य

केज तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत मामे भावाने अत्याचार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली. आरोपीने या पीडित मुलीचे तोंड रुमालाने दाबले आणि तिचे हात दोरीने बांधून तिच्यावर बळजबरी केली. या भयंकर प्रसंगानंतर हादरलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी पावले उचलली. मात्र, त्यांना पुढे शासकीय यंत्रणेकडून मिळणारी वागणूक अत्यंत क्लेशदायक ठरेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

आरोग्य विभागाची माणुसकी ओशाळली

घटनेनंतर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी केज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. पीडितेच्या नातेवाईकांनी लावलेल्या गंभीर आरोपानुसार, रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी 'महिला स्त्रीरोगतज्ज्ञ' (Gynecologist) उपलब्ध नसल्याचे जुजबी कारण सांगितले.

या कारणास्तव पीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात सकाळी 11 वाजल्यापासून ते थेट रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल 10 तास ताटकळत ठेवण्यात आले. एका गंभीर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडितेबाबत एवढी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे.

गुन्हा दाखल करण्यासाठी पहाटेपर्यंत थांबवलं

हॉस्पिटलमधील 10 तासांच्या प्रचंड त्रासानंतर कसाबसा वैद्यकीय तपासणीचा सोपस्कार पूर्ण झाला. त्यानंतर रात्री 9 वाजता पीडितेचे नातेवाईक आणि पोलीस तिला घेऊन केज पोलीस ठाण्यात (Kej Police Station) पोहोचले. मात्र, तिथेही त्यांना पोलिसांच्या दिरंगाईचा सामना करावा लागला.

रात्री 9 वाजता पोलीस ठाण्यात येऊनही या प्रकरणाचा अधिकृत गुन्हा दाखल करण्यासाठी पहाटेचे 5 वाजले. म्हणजेच गुन्हा नोंदवून घेण्यासाठी पोलिसांना तब्बल 8 तास लागले. या दरम्यान, आधीच मानसिक आणि शारीरिक छळ सहन केलेल्या पीडितेसह तिच्या पालकांनी संपूर्ण रात्र पोलीस ठाण्याच्या बाकावर जागून काढली.

शासकीय यंत्रणेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप

या संपूर्ण प्रकारामुळे केजमधील आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणांवर लोकांकडून कडक शब्दांत टीका केली जात आहे. अल्पवयीन पीडितेच्या बाबतीत पोक्सो (POCSO Act) अंतर्गत अत्यंत जलद आणि संवेदनशीलतेने प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र, येथे पीडितेचा दिवस रुग्णालयात आणि रात्र पोलीस ठाण्यात गेली. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.