धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी व्यावसायिकाला लुटलं, 55 लाखांची फसवणूक, दोघींनाही अटक
सुरेश काटे May 28, 2026 07:43 PM

Kalyan Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो.  मात्र, कल्याणमध्ये चक्क दोन महिलांनी मिळून एका नामांकित व्यावसायिकाला लग्नाच्या जाळ्यात ओढून तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे.

विविध कारणे सांगत संबंधित व्यावसायिकाकडून पैसे घेतले

कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे सांगत तिने व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आणि त्यानंतर विश्वास संपादन केला. रोमा परदेशी हिने इन्शुरन्स च्या नावाखाली व्यवसायिकाकडून लाखो रुपये घेतले मात्र इन्शुरन्स पॉलिसी उघडण्यात आली नाही. काही दिवसानंतर रोमा हिने जयश्री पाटील मार्फत संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत संबंधित व्यावसायिकाकडून पैसे घेतले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे 55 लाख रुपये या दोघींना दिले आहेत .

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रोमा परदेशी हिला अटक केली होती. तिला नंतर जामीन मिळाला. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी तिची मैत्रीण जयश्री पाटील हिला कोल्हापूरमधून अटक केली. तक्रारदार व्यावसायिकाने पोलिसांकडे आपले पैसे परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. “लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत फसवणूक करण्यात आली. आरोपींकडून रक्कम वसूल करून मला न्याय मिळावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासता महात्मा फुले पोलीस करीत आहेत.

ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली तब्बल साडेसहा हजार रुपयांची फसवणूक

 
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील टील्सन मार्केटसमोर दिशा मशिनरी या दुकानात ऑनलाइन पेमेंटच्या नावाखाली तब्बल साडेसहा हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दोन जणांनी दुकानदाराला गंडा घालत पाण्याची मोटार घेऊन पलायन केलं असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दुकान मालक अशोक मदनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून त्यांच्या दुकानात आले. त्यांनी नवीन पाण्याची मोटार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. मोटारीची किंमत साडेसहा हजार रुपये होती. यातील एक युवक दुकानाबाहेर थांबला होता, तर दुसरा दुकानात खरेदी करत होता. मोटार खरेदी केल्यानंतर संबंधित युवकाने गुगल पे द्वारे पैसे देण्याचं सांगितलं. त्याने दुकानातील स्कॅनरवर पेमेंट केल्याचं दाखवलं. मात्र काही वेळाने दुकानदाराने खातं तपासलं असता पैसे जमा झाले नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दोन्ही युवक पाण्याची मोटार घेऊन दुचाकीवरून पसार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.