Bollywood Actress : बाहेरून यश आणि स्वप्नांनी भरलेली दिसणारी मुंबईची फिल्म इंडस्ट्री आतून अनेकदा वेदना, एकटेपणा आणि मानसिक तणावाने भरलेली असते. अशाच एका धक्कादायक घटनेने 2015 मध्ये संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले होते. ‘बीए पास’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शिखा जोशी हिच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
40 वर्षीय शिखा जोशी मोठी अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली होती. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती सातत्याने संघर्ष करत होती. ‘बीए पास’ या चित्रपटात काम केल्यानंतर तिच्या करिअरला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षेप्रमाणे काम मिळाले नाही. सततची निराशा, मानसिक ताण आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे ती हळूहळू नैराश्यात गेली.
2015 च्या सुरुवातीपासूनच शिखाच्या वागण्यात मोठे बदल दिसू लागले होते. ती अभिनेत्री मधु भारती यांच्या फ्लॅटमध्ये राहत होती. मृत्यूच्या दोन आठवडे आधीपासून तिने स्वतःला घरातच बंद करून घेतले होते. ती बाहेर जाणे टाळत होती आणि कोणाशीही जास्त बोलत नव्हती. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी तिने मद्यपानाचा आधार घेतल्याचेही सांगितले जाते.
‘मी पूर्णपणे संपले आहे..’
16 मे 2015 रोजी दुपारपासूनच शिखा मद्यपान करत होती. त्या वेळी फ्लॅटमध्ये तिची मैत्रीण मधु भारती आणि आणखी एक मैत्रीण अनु उपस्थित होत्या. काही वेळानंतर मधु यांना झोप लागली. त्याच दरम्यान शिखा शांतपणे उठून बाथरूममध्ये गेली.
काही वेळाने मधु यांना जाग आली तेव्हा शिखा कुठेच दिसत नव्हती. त्यांनी संपूर्ण घरात शोध घेतला. अखेर त्यांनी बाथरूमचे दार ठोठावले. सुरुवातीला आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. मात्र वारंवार हाक मारल्यानंतर आतून शिखाचा रडलेला आवाज आला. आता लोक मला पकडतील… मी पूर्णपणे संपले आहे, असे ती म्हणाल्याचे सांगितले जाते. मधु यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शिखाने आता तुम्ही मला वाचवू शकणार नाही असे उत्तर दिले.
शिखाचा जबाब व्हिडीओ
काही वेळाने दार उघडण्यात आले आणि समोरचे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. संपूर्ण बाथरूममध्ये रक्त साचले होते. शिखाने स्वयंपाकघरातील चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. तिच्या गळ्यावर खोल जखमा होत्या आणि ती गंभीर अवस्थेत तडफडत होती.
घटनेनंतर मधु भारती यांनी तत्काळ आपल्या पती रियाज पठाण यांना फोन केला. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिखाचा जबाब व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये शिखाने तिच्या मानसिक आणि शारीरिक शोषणासाठी काही व्यक्तींना जबाबदार धरल्याचे समोर आले होते. या घटनेने मनोरंजन क्षेत्रातील तणाव, शोषण आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर मोठी चर्चा सुरू झाली होती.