आजकाल बदलती जीवनशैली, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेकांना सुरुवातीला याची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा ही समस्या गंभीर होईपर्यंत लक्षातही येत नाही.
डॉक्टरांच्या मते, हाय ब्लड प्रेशरला ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं. कारण हा आजार शरीरात शांतपणे वाढत राहतो आणि हळूहळू हृदय, मेंदू आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करू लागतो. वेळेवर काळजी घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र चांगली गोष्ट म्हणजे काही साधे पण महत्त्वाचे बदल केल्यास ब्लड प्रेशर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
मीठाचं प्रमाण
ब्लड प्रेशर वाढण्यामागे जास्त मीठ खाणं हे एक मोठं कारण मानलं जातं. शरीरात सोडियमचं प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच रोजच्या आहारात मीठाचं प्रमाण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर बाहेरचे जंक फूड, चिप्स, पॅकेज्ड पदार्थ आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळल्यास शरीरात सकारात्मक बदल जाणवू शकतो.
वजन कमी
अतिरिक्त वजनामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. फक्त काही किलो वजन कमी झालं तरी शरीरावर आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमित चालणे, हलका व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरतो.
अपुरी झोप
रात्री उशिरापर्यंत जागरण आणि अपुरी झोप याचा थेट परिणाम शरीरातील हार्मोन्सवर होतो. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान 7 तास शांत आणि सलग झोप घेणं आवश्यक आहे. चांगली झोप घेतल्याने शरीर रिलॅक्स राहतं आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मद्यपान
अधिक प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्याचबरोबर सततचा मानसिक ताणही BP वाढण्याचं एक मोठं कारण आहे. योग, ध्यान, श्वासाचे व्यायाम आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधं महत्त्वाची असली तरी निरोगी जीवनशैली ही सर्वात प्रभावी गोष्ट मानली जाते. वेळेवर जेवण, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवणं या छोट्या सवयी भविष्यात मोठ्या आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतात.