अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
डॉ. कृष्णा केंडे May 28, 2026 09:43 PM

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील विटावा शिवारातील अज्ञात तरुणाच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हत्येनंतर इन्स्टाग्रामवर (Instagram) 'टपका रे टपका' रील पोस्ट करणं आरोपींना महागात पडलं. हाच धागा पकडत पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या 500 रुपयांच्या किरकोळ वादातून या तरुणाचा जीव घेण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

या थरारक हत्याकांडात ओंकार चंद्रकांत सूर्यवंशी (वय 22, रा. रामनगर सांगवी, नांदेड) असं खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रवी देविदास दुधमल (वय 19, रा. नांदेड), सय्यद हाशिम सय्यद हसन (वय 18, रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत ओंकार आणि त्याला संपवणारे आरोपी हे सगळेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे.

Instagram Reels Clue : इन्स्टा रील बनली पोलिसांसाठी 'दुवा'

ही घटना 14 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विटावा शिवार परिसरात घडली होती. सुरुवातीला मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानं पोलिसांनी केवळ अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, 18 मे रोजी पोलिसांचा संशय अधिक गडद झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर आलेल्या पोस्टमॉर्टम (Post Mortem) अहवालात तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचं वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट झालं. 

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता एक संशयित दुचाकी पोलिसांना दिसली. याच दरम्यान आरोपींनी खून केल्यानंतर इन्स्टाग्रामवर “टपका रे टपका” या गाण्यावर एक रील आणि स्टोरी पोस्ट केली होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत या सोशल मीडिया अकाउंटवरून आरोपींची अचूक ओळख पटवली.

Chhatrapati Sambhajinagar Police Fake Identity : पोलिसांची भाजी विक्रेते बनून पाळत

आरोपींची ओळख पटल्यानंतर ते नांदेड परिसरात लपल्याची गुप्त माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने नांदेडला रवाना झाले. सलग तीन ते चार दिवस पोलिसांनी तेथे गुप्त पाळत ठेवली. आरोपींना संशय येऊ नये म्हणून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क भाजी विक्रेत्याचा वेश परिधान केला होता. या अनोख्या वेशातील पोलिसांनी आरोपींची इत्थंभूत माहिती गोळा केली. तपासात धक्कादायक बाब अशीही समोर आली की, यातील एक आरोपी आधीच जेलमधून पसार होऊन संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी कृत्य करत होता.

MIDC Waluj Police Action : 500 रुपयांच्या वादातून घेतला जीव

आरोपी परराज्यात फरार झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी राज्याबाहेरही शोधमोहीम राबवली. मात्र, आरोपी पुन्हा आपल्या परिसरात परतत असल्याची अचूक टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी अवघ्या 500 रुपयांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून ओंकारचा खून केल्याची कबुली दिली.

Sambhajinagar Cyber Cell : पोलीस आयुक्तांकडून पथकाचं कौतुक

या अत्यंत गंभीर, गुंतागुंतीच्या आणि किचकट गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सायबर सेलच्या मदतीने अत्यंत कौशल्यपूर्ण कामगिरी बजावली. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पार पाडली असून पोलीस दलातून त्यांचे कौतुक होत आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.