घरगुती वादातून मद्यपी मुलानं दिव्यांग संपवलं, धक्कादायक घटनेनं भंडारा हादरलं, आरोपी मुलाला अटक
Marathi May 30, 2026 11:25 PM

भंडारा क्राईम न्यूज : भंडारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून मद्यपी मुलानं दिव्यांग वडिलांची फावड्यानं निर्घृण हत्या केली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खरबी इथं घडली आहे. तुकडु बावणे असं 65 वर्षीय मृत व्यक्तीचं नावं आहे.

मध्यस्थी करायला गेलेला 15 वर्षीय मुलगा जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मद्यपी मुलगा आणि वडिलांचा वाद सुरु होता. यावेळी यावेळी मद्यपी मुलानं दिव्यांग वडिलांची फावड्यानं निर्घृण हत्या केली आहे. मध्यस्थी करायला गेलेला 15 वर्षीय आर्यन बावणे हा गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गणेश उर्फ सोनु बावणे (27) असं आरोपी मुलाचं नावं असून त्याला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून बापानेच संपवलं मुलीला

कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या एका विवाहित तरुणीला अत्यंत निर्घृणपणे संपवून फरार झालेल्या नराधम वडिलाला बाजारपेठ पोलिसांनी अखेर अटक केली. या खळबळजनक अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या हत्येमागील जे कारण समोर आलं आहे, त्याने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला आहे. केवळ मुलीने आपल्या मनाविरुद्ध आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच तिचं आयुष्य संपवल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.

दोन वेळा साखरपुडा मोडला, नंतर केला विवाह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलाचे नाव असून, गायत्री असं मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, गायत्रीने कुटुंबाच्या पसंतीला नाकारून इतर जातीतील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता. वडिलांनी गायत्रीसाठी आधी दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी साखरपुड्याची (Engagement) मोठी तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते दोन्ही स्थळं नाकारले होते. त्यानंतर तिने स्वतःच्या पसंतीने इतर जातीत लग्न उरकले. याच गोष्टीचा प्रचंड राग आणि सुडाची भावना विनोद वसईकर याच्या मनात कायम धुमसत होती. लग्नानंतर काही दिवसांनी गायत्री काही कामासाठी आपल्या माहेरी रचना रॉयल इमारतीमधील घरी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील विनोद वसईकर आणि मुलगी गायत्री यांच्यात विवाहाच्या जुन्या विषयावरून पुन्हा एकदा तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोदने घरात असलेले धारदार शस्त्र काढून गायत्रीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.