Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...
esakal May 31, 2026 12:45 AM

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका (Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack) केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना त्यांनी, "सत्ताधारी आता खुनी बनले आहेत. भाजपला याची लाज वाटली पाहिजे," असं त्या म्हणाल्या.

शनिवारी (ता. ३०) सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत त्यांना दुखापत झाल्याने त्यांना कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली राज्य सरकारवर अभिषेक बॅनर्जी यांचे गंभीर आरोप

हल्ल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अभिषेक बॅनर्जी यांनी राज्य प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "माझ्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिल्यानंतरही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला नाही. यावरून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ही परिस्थिती सुरूच राहावी असे वाटत असल्याचे दिसते. राज्य सरकारकडून हिंसाचार रोखण्यासाठी कोणताही ठोस प्रयत्न होताना दिसत नाही."

ते पुढे म्हणाले, "यापूर्वी या परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आणखी काही जणांचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? आमच्याकडे सर्व घटनांचे पुरावे आहेत. आम्ही न्यायालयात जाऊ आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढू."

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी? "माझ्यावर विटा, दगड आणि अंडी फेकण्यात आली"

हल्ल्याचा तपशील सांगताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "माझ्यावर विटा, दगड आणि अंडी फेकण्यात आली. जवळील एका कम्युनिटी हॉलमध्ये सकाळपासून काही लोक जमा झाले होते. त्यांचा उद्देश दगडफेक करणे हाच होता. या हल्ल्यात माझ्या डोळ्याला दुखापत झाली असून चष्माही तुटला आहे. पाठीवर, छातीवर, हातांवर आणि पायांवरही मार लागला आहे."

ते म्हणाले, "मी हेल्मेट घातले होते, अन्यथा माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असती. ते माझ्या शरीरावर हल्ला करू शकतात, पण माझा निर्धार आणि लढण्याची जिद्द मोडू शकत नाहीत. माझे मस्तक कोणासमोरही झुकणार नाही."

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं? भाजपकडून हल्ल्याचा निषेध

दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनीही या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले, "जनतेने कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये. अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसविरोधात लोकांमध्ये मोठा रोष आहे, हे खरे असले तरी हिंसाचार हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही."

मजुमदार यांनी आरोप केला की, "सत्तेत असताना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधकांशी अपमानास्पद वर्तन केले. त्याचे पडसाद आज दिसत आहेत. मात्र, राज्यातील जनतेने शांतता राखली पाहिजे."

"बंगाल हिंसामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे"

सुकांता मजुमदार पुढे म्हणाले, "निवडणुकांपूर्वी अभिषेक बॅनर्जी यांनी भाजप कार्यकर्त्यांना उघड धमक्या दिल्या होत्या. विरोधी पक्षातील नेत्यांच्या ताफ्यांवरही अनेकदा हल्ले झाले होते. आज परिस्थिती बदलली असली तरी हिंसाचाराला कोणतेही समर्थन देता येणार नाही. तसेच पश्चिम बंगालची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि राज्यातील राजकारण हिंसामुक्त करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.