<<पॅसिफिक गौतम>>
नांदेड येथील नव्या पिढीतील आश्वासक, दमदार लेखक व कवी, रवींद्र तांबोळी यांचा लेखसंग्रह ‘अंगठा लाईक आणि द्रोणाचार्य’ आणि ‘मी फक्त ठेवली गाथा’ हा काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशित झाले.
लेखक रवींद्र तांबोळी यांचे कार्यक्षेत्र पशुवैद्यकीय आहे, तेथे विविध महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडून पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले. कार्यक्षेत्र वेगळे असले तर त्यांचे विनोदी लेखन क्षेत्रातील लेखन योगदान महत्त्वाचे व ठळक आहे. या पुस्तकाआधी त्यांचे गिरकी, उसंतवाणी, थट्टामस्करी, पत्नीपुराण, फुकटचे सल्ले अशी पुस्तके येऊन गेली व ती बेस्टसेलरही ठरली आहेत. या शिवाय ते दरवर्षी निवडक दिवाळी अंकासाठी महत्त्वाचे विनोदी व गंभीर लेखन सातत्याने करीत असतात. वडील व ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांचा वारसा चालवत त्यांनी मोजक्या पण वेगळ्या कविता लिहिल्या आहेत. खरे तर विनोदी वाङ्मय क्षेत्रात अनेक पूर्वसुरींचे योगदान आहे आणि ते सर्वश्रुत आहे, पण नव्या पिढीतील तो धागा फार ताकदीने दिसत नाही. मुकुंद टाकसाळे, डॉ. आनंद देशपांडे, रवींद्र तांबोळी यांचे अपवाद सोडला तर अन्य आश्वासक नावे ठळकपणे दिसत नाही.
प्रस्तुत विनोद लेख संग्रहाचे वेगळेपण सुरू होते, ते शीर्षकापासून. अंगठा लाईक आणि द्रोणाचार्य, फेस फेसाळता फेसबुकी, फेसबुकी तर प्रसिद्धी.. आमच्या सोशल मीडियाचा आढावा, तरीही तो प्रेमात पडलाच नाही, बाईनेच ठेवला बाबा, हृदय की मन ः आमचा आयुष्यभराचा गोंधळ, चोरून मराठी, कमविले नाव, आमचे साहित्य संमेलनविषयीचे विचार, आमचे भलतेच दुष्काळ चिंतन, आमचे पर्यटन अर्थात आमच्या चातुर्यप्राप्तीचा योग, आमची ‘अशीही’ आर्थिक उडी! आमचे साहेब आणि त्यांचे कालानुरूप विचार, आमचा चांद्रिय गोंधळ, भाऊसाहेबांचे पॉलिटिकल लॉन्चिग, खड्डे विकास महामंडळ आणि वारसा नोंद असे वैविध्यपूर्ण खुसखुशीत लेख पुस्तकात आहेत. लेखाची सर्वच शीर्षके लालित्यपूर्ण शैलीत आहेत. पूर्वसुरीच्या लेखनाचे विषय आणि नव्या पिढीतील लेखकास भावणारे विषय यात आता बराच फरक पडला आहे. सरकारी साहेब, सरकारी बाबू हे पूर्वीच्या काळात येऊन गेले असले तरी ते याही काळात येतातच. त्यात आता सोशल मीडियाचा एवढा प्रभाव पडला आहे की त्यात नीट बघितले तर विनोदी लेखनाची अनेक बीजं लेखकास सापडतात. लेखसंग्रहातील अर्धे विषय ‘आमचे’ या शब्दांनी व्यापले आहे. विनोद कसा कुठे घडतो, याचा शोध लेखक घेतच असतात. संगती-विसंगतीत तफावत दिसली की लेखकास तिथे विनोद सापडतो.
‘मी फक्त ठेवली गाथा’ हा रवींद्र तांबोळी यांचा दुसरा कवितासंग्रह होय. त्यात निवडक कविता समाविष्ट आहेत, यातील कविता हंस, किस्रीम, अक्षर, यक्ष, अंतर्नाद, कवितारती, प्रतिष्ठान, साक्षात, अनुभव, काव्यग्रह, निर्मल साहित्य शोभा, द संडे इंडियन, समरसता, चैत्रेय या दिवाळी अंक व नियतकालिकात येऊन गेल्या आहेत, यातील काही कविता दीर्घ पल्ल्याचा आहेत, काही वेळेस छोटे काव्यमय ललित आहेत की काय, असे वाटून जाते. अभिराम अंतरकर संग्रहाच्या ब्लर्ब मध्ये सांगतात, ‘मनस्वी निर्व्याज मोकळेपणा हा रवींद्र तांबोळी यांचा स्वभाव गुण आहे, हाच स्नेह सुलभ मोकळेपणाने त्यांच्या कवितेतही प्रतिबिंबित झालेला दिसतो.’
संग्रहातील काही लक्षवेधी कविता अधोरेखित करता येतील. ‘जन्म हा संदर्भ आणि या गावाशी माझे नाते आहे’, ‘पूर्वी आम्ही’, ‘स्निग्ध प्रकाशात उमलली’, ‘हे मृगा तू भरून ये’, ‘वैशाखाला श्रावण डसला’, ‘सुसाट सुटले, ‘देहाचे गळते न कळत प्राण’, ‘पूर्ण ऋतुभर’, ‘आयुष्य सारे कसे’, ‘किल्लारी रामप्रहरी’ अशा काही कविता वेगळ्या वाटतात. मात्र ‘कवितेविना’ या कवितेत कवीची आर्तता लक्षात येते..
कवितेविना तसे कैक दिवस वाया गेले..
रात्र रात्र तळमळूनही शब्द कुठे हरवून गेले?
किती भोगले दुःख आजवर, काही तरी सुचायला.
अंगठा लाईक आणि द्रोणाचार्य
मूल्य ः 300 ह पृष्ठे ः 175
मी फक्त गाथा ठेवली
मूल्य ः 170 ह पृष्ठे ः 95
लेखक ः रवींद्र तांबोळी.
प्रकाशक ः पद्मगंधा प्रकाशन, पुणे